सिव्हिलच्या १०० बेड्सना सेंट्रलाइज आॅक्सिजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:39 IST2020-06-17T23:08:36+5:302020-06-18T00:39:48+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात प्रारंभी केवळ ३० बेड्ससाठी करण्यात आलेली आॅक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था तिपटीहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोविड रुग्णालयातील १०० बेड्सला पाइपलाइनद्वारे सेंट्रलाईज आॅक्सिजनची व्यवस्था उभी करण्याच्या कामकाजाला वेग देण्यात आला आहे.

सिव्हिलच्या १०० बेड्सना सेंट्रलाइज आॅक्सिजन!
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात प्रारंभी केवळ ३० बेड्ससाठी करण्यात आलेली आॅक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था तिपटीहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोविड रुग्णालयातील १०० बेड्सला पाइपलाइनद्वारे सेंट्रलाईज आॅक्सिजनची व्यवस्था उभी करण्याच्या कामकाजाला वेग देण्यात आला आहे. आठवडाअखेरपर्यंत ही सर्व सेंट्रलाईज आॅक्सिजन सुविधा कार्यान्वित होणार असल्याने वाढत्या रुग्णसंख्येतील गंभीर रुग्णांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.
सिव्हिलमध्ये प्रारंभीच्या टप्प्यात आॅक्सिजन पुरवठ्यासह तीस आयसीयू बेड्स उभारले जाणार होते. मात्र, नाशिक महानगरासह जिल्हाभरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन तातडीने त्यात भर घालण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आला. त्यामुळे आता कोविडच्या रुग्णालयातील सर्व १०० बेड्सना सेंट्रलाईज आॅक्सिजन पाइपलाइनद्वारे आॅक्सिजन पुरवठ्याची सोय करण्यात येणार आहे. कोरोनामुळे अत्यावस्थ झालेल्या आणि श्वासोच्छ्वासास त्रास वाटणाऱ्या रुग्णांना तातडीने आॅक्सिजनची सोय लागणार आहे, यामुळे त्यांना तत्काळ आॅक्सिजन सुविधेने सुसज्ज बेड उपलब्ध होऊ शकणार आहे. वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनेक डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञ, वैद्यकीय कर्मचारी यांनादेखील कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने या रुग्णालयातील तीस ते पस्तीस बेड आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणताही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी बाधित झाला तरी त्याच्यावरही योग्यप्रकारे उपचार करणे शक्य होणार आहे.
--------------------------
जिल्हा रुग्णालयातील सेंट्रलाईज आॅक्सिजन यंत्रणेच्या कामाला गती देण्यात आली असून, रविवारपर्यंत काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास अधिक प्रमाणात जाणवतो, त्यांच्यासाठी सेंट्रलाईज आॅक्सिजन बेडची सुविधा खूप दिलासादायक ठरू शकणार आहे.
- डॉ. निखिल सैंदाणे,
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक