इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबईतील काही व्यक्तींनी इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये अनधिकृतपणे सुरू केलेल्या कॉल सेंटरवर शनिवारी (दि. ९) सीबीआयच्या पथकाने छापा टाकून हे केंद्र उद्ध्वस्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, मोबाइल, कार, क्रिप्टोकरन्सी, सोने आदी कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला.
रेनफॉरेस्ट रिसॉर्ट येथे मुंबईतील काही जणांनी बनावट कॉल सेंटर सुरू करून सुमारे ६० कर्मचारी नेमले होते. या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांना गिफ्ट कार्ड व क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून फसवले जात होते. ८ ऑगस्ट रोजी सीबीआयकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपी अॅमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेसचे कॉल सेंटर असल्याचे भासवत परदेशी नागरिकांची गोपनीय माहिती मिळवून त्यांची फसवणूक करत होते.
कोट्यवधीची मालमत्ता ताब्यात
१ सीबीआयने खात्री पटताच शनिवारी छापा टाकला. त्या वेळी ठिकाणी ६२ जण कार्यरत होते, ज्यात टेलिकॉलर्स व व्हेरिफायर यांचा समावेश होता. कारवाईत मुंबईतील विशाल यादव, शेबाझ, दुर्गेश, अभय ऊर्फ राजा आणि समीर ऊर्फ कालिया ऊर्फ सोहेल या पाच जणांना अटक करण्यात आली.
२ छाप्यात ४४ लॅपटॉप, ७१ मोबाइल, १.२० कोटी बेहिशोबी रोकड, ५०० ग्रॅम सोने, सात आलिशान गाड्या, ५ लाखांची क्रिप्टोकरन्सी, तसेच १.२६ लाख रुपयांची कॅनेडियन गिफ्ट कार्डे जप्त करण्यात आली.
२० खोल्यांत सेंटर
कॉल सेंटरचे २० खोल्यांत ६० जण वास्तव्यास
बुकिंग : ८ ऑगस्टपासून तीन दिवस बुकिंग मुंबईतील एका कंपनीच्या नावाने
धाडीसाठी सीबीआयचे १५ अधिकारी, चार गाड्यांत आगमन