नाशिक : मिशन बिगेन अंतर्गत शहरात दुकाने सुरू करण्याठी महापालिकेने परवानगी दिली. मात्र, त्यासाठी सम-विषमची अट असतानादेखील ती धुडाकावून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्याने गोंधळ उडाला. शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला मंगळवार (दि.९)पासून प्रारंभ केला आहे. आता त्यानंतरही व्यावसायिकांनी उल्लंघन केल्यास संंबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शहरातील सर्व बाजारपेठा बंद आहेत. शासनाने आता सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील शिथिलतेचे अधिकार दिले. त्यानुसार शहरातील बाजारपेठा सुरळीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यापारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि सम-विषम यापद्धतीनेच दुकाने सुरू करता येतील असे सांगितले तर ज्या ठिकाणी सम-विषम लागू करण्यायोग्य बाजारपेठा नाही त्याबाबत विभागीय अधिकारी निर्णय घेतील, असे जाहीर केले. त्यानंतर शनिवारी (दि.६) बाजारपेठा खुल्या झाल्या; परंतु कोणत्याही प्रकारे सम-विषम तारखानुसार दुकाने सुरू करण्याचे पथ्य पाळले नाही. अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. नाशिकमध्ये आधीच कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन चारशेच्या पुढे गेली असताना बाजारपेठात झालेली गर्दी धडकी भरवणारी ठरली. त्यातच अनेकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते की, मास्क नव्हते. जंतुनाशकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतदेखील काळजी घेतली जात नव्हती. त्यानंतर महापालिकेने आता अशाप्रकारे नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद करतानाच संबंधितांच्या विरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेने आता स्वत: सम-विषमच्या अंमलबजावणीस पुुढाकार घेतला आहे. त्यानुसार मेनरोडसह अन्य भागांत बाजारपेठेतील कोणती दुकाने सम तारखेस उघडतील आणि कोणती विषम तारखेस त्यासंदर्भातील आखणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असे महपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
खबरदारी : मेनरोडसह बाजारपेठांमध्ये आता सम-विषमची आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 17:37 IST
शासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला प्रारंभ केला आहे.
खबरदारी : मेनरोडसह बाजारपेठांमध्ये आता सम-विषमची आखणी
ठळक मुद्देमिशन बिगेन अंतर्गत शहरात दुकाने सुरूबाजारपेठांमध्ये सम-विषमची आखणी गोंधळ टाळण्यासाठी महापावलिकेचे पाऊल