वाहन लांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:56 IST2020-06-24T17:56:15+5:302020-06-24T17:56:43+5:30
सिन्नर: तालुक्यातील चापडगाव येथे बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 41 वर्षीय तरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

वाहन लांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पकडले
सिन्नर: तालुक्यातील चापडगाव येथे बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 41 वर्षीय तरुणास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
संतोष बबनराव वायकर असे या संशयिताचे नाव आहे. तो मूळचा नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून वर्षभरापूर्वी अकोले येथे सासुरवाडीला वास्तव्यास होता. मध्यरात्रीच्या सुमारास चापडगाव येथील कुंभारखणी भागात राहणाऱ्या हरीदास निवृत्ती आव्हाड यांच्या दुचाकीचे लॉक तोडण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, ते लॉक न तुटल्याने त्याने शेजारीच उभी असलेल्या आव्हाड यांच्या कारचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. कार चालू करत असल्याच्या प्रयत्नातून त्याचा हॉर्न ला धक्का लागला. गाडीचा हॉर्न अचानक वाजत असल्याचा आवाज ऐकून आव्हाड घराबाहेर आले असता पळण्याच्या तयारीत असलेला चोरटा दिसला. त्यांना गाडीकडे पळत येतांना पाहून चोरट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून ठेवत आव्हाड यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिकांनी तेथे धाव घेतली. दरम्यान पोलीस पाटील अंकुश आगिवले यांनी या घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक विकास काळे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली ओळख लपवत होता. मात्र, पोलिसांनी दरडावून विचारल्यावर त्याने आपले खरे नाव गाव सांगितले.