बाजारभावातील अनियमिततेमुळे नगदी पिकांची शेती अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:18+5:302021-09-13T04:13:18+5:30
देवळा : तालुक्यात यंदाच्या वर्षी ३० हजार ४० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. सर्वाधिक क्षेत्र हे ...

बाजारभावातील अनियमिततेमुळे नगदी पिकांची शेती अडचणीत
देवळा : तालुक्यात यंदाच्या वर्षी ३० हजार ४० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. सर्वाधिक क्षेत्र हे मका लागवडीखाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर झाली होती. तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यातील काही गावांचा समावेश करून, १९९९ मध्ये देवळा तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती. यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून आजही हा तालुका तीन भागात विभागला गेला आहे. गिरणा नदीपात्र लगत शाश्वत पाणी असलेले लोहोणेर व इतर गावे, उमराणे परिसरातील पूर्णपणे नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला भाग व देवळ्याच्या पूर्व भागातील रामेश्वर, वाजगाव आदी चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेला भाग. या तिन्ही भागात पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतातील पिकांचे नियोजन शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसतात. तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक मक्याची पेरणी केली जाते. त्या खालोखाल बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, तूर आदी पिके घेतली जातात. जून महिन्याच्या पूर्वार्धात तालुक्यातील काही गावांमध्ये पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. नंतर मात्र, पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यांपुढे उभे राहिले होते, परंतु जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले व उर्वरित शेतकऱ्यांनीही आपल्या खरीप पिकांची पेरणी केली. चालू वर्षी पावसाला दीड महिना झालेला उशीर, पेरणी केलेल्या मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव याचा मका लागवडीवर परिणाम झाला. पावसाला उशीर झाल्यामुळे उशिराने मका पेरणी केल्यास, उन्हाळ्यात पाण्याअभावी रब्बी हंगाम पदरात पडणे कठीण होते. मका पेरणी केल्यास जमिनीचा पोत उतरतो . पूर्वी निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी देवळा तालुका विख्यात होता. डाळिंबाचे शाश्वत व भरघोस उत्पन्नामुळे, अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेणे सोडून देत, आपल्या सर्व क्षेत्रांवर डाळिंबाची लागवड केली, परंतु नंतर डाळिंब बागा तेल्या रोगाने नामशेष झाल्या व शेतकऱ्यांना पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळावे लागले. या पिकांवर तीन वर्षांपासून येणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट व रोगांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून, त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. काही शेतकरी दीपावलीपूर्वी अर्ली द्राक्ष बाग घेऊन भरघोस आर्थिक कमाई करत होते, परंतु वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे द्राक्ष पीक काढणे तोट्यात जाऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून टाकल्या आहेत. हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते, परंतु बाजारभावाच्या अनियमिततेमुळे कांदा पीकही जुगार ठरत आहे. कोरोनामुळे देवळा तालुक्यातील शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. या काळात सर्वत्र निराशेचे वातावरण असताना, शेतीने सर्वांना तारले. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोकरीचा नाद सोडत, शेती करण्यास पसंती दिली आहे. कोरोनाकाळात शेतकऱ्यांनी शहरात जाऊन घरात बसलेल्या नागरिकांना किफायतशीर दरात भाजीपाला, फळे आदींचा पुरवठा करताना घेतलेला मार्केटिंगचा अनुभव आर्थिक फायदा देणारा ठरल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच आता भाजीपाला पिकांकडे वळू लागले आहेत, परंतु सध्या भाजीपाल्याचे दर कोसळलेले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
इन्फो
सुविधांपासून भाग वंचित
देवळा तालुक्यात महसूल विभागाने देवळा, उमराणा व लोहोणेर या तीन मंडळाच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविलेली आहेत, परंतु देवळा तालुक्याची भौगोलिक रचना पाहता, पश्चिम भागातील खर्डा व त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेरी, वार्शी, मुलुकवाडी, कांचणे, कनकापूर, वडाळा, वाजगाव, हनुमंतपाडा आदी गावे ही डोंगरांनी वेढलेली असून, उंचावर असल्यामुळे तालुक्याच्या इतर भागात पडणाऱ्या पर्जन्यमानापेक्षा येथे पडणारे पर्जन्यमान भिन्न असते. अनेक वेळा तालुक्याच्या इतर भागात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीवर या भागातील पर्जन्यमान गृहीत धरले जाते. यामुळे या भागावर मोठा अन्याय होतो. चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभापासून ही हा भाग वंचित आहे. अत्यल्प पाऊस पडूनही अनेक वेळा या भागाची पीक आणेवारी तालुक्याच्या इतर भागातील पावसाच्या प्रमाणावर काढली गेल्यामुळे, दुष्काळात शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांपासून हा भाग वंचित राहतो. पर्जन्यमापक यंत्र नसल्यामुळे या भागात नेमका किती पाऊस झाला, याची अचूक नोंदच होत नाही.
खरीप पिकांची पेरणी झालेले क्षेत्र-
मका - १७,०४९ हेक्टर, बाजरी - ८,२१४ हेक्टर तूर - २८४ हेक्टर मूग - ८७२ हेक्टर भुईमूग - ७८०.५० हेक्टर. कडधान्य - १,२०० हेक्टर
कोट...
तालुक्यात खरीप हंगामात अनुदानावर ३७० हेक्टर क्षेत्रावर ३७ प्रकल्प राबविण्यात येऊन महिला शेतकऱ्यांसाठी मका पीक प्रात्यक्षिक क्रॉप सॅप संलग्न शेतीशाळा घेण्यात आली. शेतकरी महिलांना शेती तंत्रज्ञानाविषयी माहीती मिळावी व त्यांचा अशा शेती शाळांमध्ये सहभाग वाढावा, या उद्देशाने अभियान राबविण्यात आले. ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना औषधांचे वाटप केले आहे. वाढत्या रोगराईमुळे पिकांच्या उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. कांदा बियाणे गादी वाफे करून टाकावे.
- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळा.