पोलीस ठाण्यात गर्दी जमविल्याने हेमंत शेट्टीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:28 IST2020-08-04T16:27:27+5:302020-08-04T16:28:28+5:30
डॉक्टर मारहाण प्रकरणाशी शेट्टी किंवा त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांचा संबंध आहे का्य याबाबतही अंबड पोलीस पुढे तपास करत आहेत.

पोलीस ठाण्यात गर्दी जमविल्याने हेमंत शेट्टीवर गुन्हा दाखल
नाशिक : येथील पंचवटी विभागातील नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून जमावबंदी कायद्यासह साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलजवळ शेट्टी हे त्यांच्या पंधरापेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह उभे होते. वैद्यकिय सेवा संस्था कायद्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी पियुष उल्हास राजुरकर व आकाश अशोक पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेत कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शेट्टी यांनी पंधरा ते वीस कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात विनाकारण गर्दी केल्याचे पोलीस नाईक सुकदेव गिºहे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार शेट्टी यांच्यासह त्यांच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांविरूध्द पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. शेट्टी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलपुढे उभे असतानासुध्दा साथरोगाच्या अनुषंगाने कुठलीही खबरदारी म्हणून उपाययोजना न केल्याचे दिसून आले. तसेच विनाकारण पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास येत गर्दी करत संसर्गाचा धोका असतानासुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेट्टी व त्याच्या कार्यकर्त्यांविरूद्ध नाईक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉक्टर मारहाण प्रकरणाशी शेट्टी किंवा त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांचा संबंध आहे का्य याबाबतही अंबड पोलीस पुढे तपास करत आहेत.