गोदापात्रात आढळल्या कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:07 IST2019-09-29T00:06:17+5:302019-09-29T00:07:02+5:30
गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती.

गोदापात्रात आढळल्या कार
नाशिक : गेल्या बुधवारी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली होती. गोदावरीला आलेल्या पुरात काठालगत उभी असलेली चार वाहने वाहून गेली होती. दोन दिवसांनंतर पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहने नजरेस पडू लागली आहेत. त्यापैकी दोन कार जीवरक्षक तरुणांनी शनिवारी (दि.२८) दोन कार पाण्यातून बाहेर काढल्या.
शहरात बुधवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे गोदावरीच्या पाण्यात वाढ झाली होती. तसेच सायंकाळी गंगापूर धरणातूनही विसर्गात वाढ झाल्यामुळे गोदाकाठालगत उभ्या असलेल्या चार कार पुराच्या पाण्यात सापडल्या.
पाण्याचा प्रचंड वेग वाढल्याने या चार कार वाहून गेल्याच्या तक्रारी वाहनमालकांकडून करण्यात आल्या होत्या. आदिवासी जीवरक्षकांना मालकांनी भेटून वाहने शोधण्याचा आग्रह धरला. त्यानंतर आठ ते दहा जीवरक्षकांच्या चमुने गोदापात्रात बुडालेल्या चारचाकींचा ‘ठाव’ घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्यांना अद्याप दोनच वाहने काढण्यास यश आले आहे. दोन कारचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही.
पुरात वाहून आले अनेक साहित्य
पावसाने उघडीप दिल्याने गोदामाईचे रूप शांत झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने गोदापात्रात पुरात बुडालेल्या विविध वस्तूही नजरेस पडतील, असे जीवरक्षकांनी सांगितले. गोदाकाठालगत असलेल्या काही विक्रेत्यांच्या टपऱ्या, लोखंडी साहित्यही नदीपात्रात वाहून आले आहे, अशी माहिती जीवरक्षक सोनू पंजाबी याने दिली.