त्र्यंबकेश्वरजवळ कार-रिक्षाची समोरासमोर धडक; गुजरातचा भाविक ठार, सोलापूरचे कुटुंब जखमी
By अझहर शेख | Updated: December 19, 2024 17:56 IST2024-12-19T17:53:47+5:302024-12-19T17:56:41+5:30
अंजनेरी फाट्यावर समोरून आलेल्या सुसाट कारची गुरूवारी (दि.१९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरात येथील भाविकालाही या वाहनांची धडक बसली.

त्र्यंबकेश्वरजवळ कार-रिक्षाची समोरासमोर धडक; गुजरातचा भाविक ठार, सोलापूरचे कुटुंब जखमी
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून भाविकांना नाशिकच्या दिशेने घेऊन निघालेल्या रिक्षा (एम.एच१५ जेअे ३०२२) अंजनेरी शिवारातील सीएनजी पेट्रोलपंपाच्या अलीकडे अंजनेरी फाट्यावर समोरून आलेल्या सुसाट कारची गुरूवारी (दि.१९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरात येथील भाविकालाही या वाहनांची धडक बसली. रोहितभाई किशोरभाई चौधरी (३५,रा.गांधीनगर, गुजरात) असे मृत्यूमुखी पडलेल्या भाविकाचे नाव आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
सोलापूरहून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भिसे कुटुंबीय आले होते. गुरुवारी दर्शन घेऊन नाशिकमार्गे ते परतीचा प्रवास करणार होते. रिक्षाचालक प्रशांत वाघमारे (४५,रा. भालेराव मळा, जयभवानीरोड) यांच्या रिक्षात ते त्र्यंबकेश्वरहून बसले. अंजनेरीफाट्यावरून पुढे काही मीटर अंतरावर असलेल्या सीएनजी पंपाकडे इंधन भरण्यासाठी वाघमारे हे रिक्षा घेऊन विरूद्ध बाजूने जात होते, असे त्र्यंबक पोलिसांनी सांगितले. यावेळी रस्त्यालगत एक मिनी टेम्पोमधून माल खाली करण्यात येत होता.
रिक्षाने त्या टेम्पोला ओव्हरटेक केला असता अचानकपणे समोरून आलेल्या कार (एम.एच०२ सीएच ९७११) आणि रिक्षा यांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षामधील लहान मुले, महिला, पुरूष बाहेर फेकले गेले. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून एका इसमाची व मुलामुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.
दिलीप भिसे, लक्ष्मी भिसे यांच्यासह मुले सिद्धार्थ भिसे (८), निशा भिसे, श्रद्धा भिसे (सर्व, रा.सोलापूर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यवर नाशिकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मिनी टेम्पोचालक संदीप रघुनाथ शिनकर (३५,रा.सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक संशयित वाघमारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.