अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:44 IST2025-07-24T10:43:15+5:302025-07-24T10:44:25+5:30

गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. 

Car accident on way to Nashik from Trimbakeshwar, friends Pankaj Datir, Abhishek Ghule die | अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर  - त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (२८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे.

त्र्यंबकेश्वरला पंकज आणि अभिषेक हे कारने मंगळवारी सकाळी गेले होते. रात्री ते परतीचा प्रवास करत असताना अचानकपणे कारच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार दुभाजकावर आदळून कोलांटउड्या खात उलटली. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी फाट्यावर धाव घेत पोलिसांना कळवले. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रुपेश मुळाणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. 

अखेरचा श्वास सोबत घेतला...

पंकज दातीर हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण आणि सहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तर अभिषेक घुले हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबातील तरुण मुले गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज आणि अभिषेक हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघांनी सोबतच अखेरचा श्वास घेतला. अंबड गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पंकज आणि अभिषेक हे दोघे पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यांची ही मैत्री बालपणापासून घट्ट होती. दोघे कायम सोबत असायचे. त्यांचा परिसरात चांगला संपर्कही होता. त्यामुळे दोघांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी लोटली होती. 

Web Title: Car accident on way to Nashik from Trimbakeshwar, friends Pankaj Datir, Abhishek Ghule die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात