डझनभर दुचाकींसह ट्रॅक्टर हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:32 IST2018-03-20T00:32:48+5:302018-03-20T00:32:48+5:30
महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा यशस्वीपणे माग काढला. त्यांना ताब्यात घेत विविध कंपन्यांच्या चोरीच्या नऊ दुचाकींसह एक ट्रॅक्टर असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

डझनभर दुचाकींसह ट्रॅक्टर हस्तगत
नाशिक : महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकीचोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकी चोरट्यांचा यशस्वीपणे माग काढला. त्यांना ताब्यात घेत विविध कंपन्यांच्या चोरीच्या नऊ दुचाकींसह एक ट्रॅक्टर असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरासह उपनगरीय भागांमधून दुुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत पोलीस उपआयुुक्त विजय मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी गुन्हे शाखा, युनिट-१/२च्या पथकाला माहिती देत तत्काळ तपास करून शहरात सक्रिय असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा ‘टास्क’ दिला. यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, शांताराम महाले, रावजी मगर आदींनी तपासचक्रे फिरविली. दरम्यान, एका गुप्त माहितीगाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वारावर दोघे संशयित चोरटे आले. यावेळी साध्या गणवेशातील पोलिसांच्या पथकाने दोघांच्या मुसक्या बांधल्या. संशयित गणेश नारायण रसाळ (३३, रा. सिन्नर), सुनील साहेबराव देशमुख (२४, रा.नेहरूनगर पुणे) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना खाकीचा हिसका दाखविला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी शिर्डी संस्थानच्या दवाखान्याच्या वाहनतळामधून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच शिर्डी बसस्थानक, सिन्नर परिसरातून एकूण नऊ दुचाकी चोरल्याचे सांगितले. तसेच भोसरी, पुणे येथील उड्डाणपुलाखाली उभा केलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याचे सांगितले. त्यांनी दडवून ठेवलेला हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अंबडमधील चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगत
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुचाकी चोर येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे सहायक उप्निरीक्षक जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागुल यांना मिळाली होती. त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात सापळा रचला. पोलिसांनी संशयित मेहताब मोहंमद अफ्फान खान (२७, रा. अंबड) यास परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकूण ६५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.