शेतक-यांच्या थेट बांधावर कोबी खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:31 IST2018-08-27T18:31:01+5:302018-08-27T18:31:24+5:30
विक्रमी उत्पादन : गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मालाची विक्री

शेतक-यांच्या थेट बांधावर कोबी खरेदी
खामखेडा- भाजीपाला वर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून त्याचे नाव गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमध्ये नाव प्रसिद्ध असल्याने गुजरात मधील व्यापारी शेतक-यांच्या थेट बंधावर येऊन कोबी खरेदी करीत आहेत.
खामखेडा गाव व परिसरात कोबी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दोन-तीन वर्षापूर्वी या कोबीच्या उत्पादनाने अनेक शेतक-यांचे स्वप्न फुलविले आहे. परिसरात शेतकरी हमखास कोबीची लागवड करतो. त्यामुळे गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतक-यांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करून करीत आहे. त्यामुळे शेतक-याला बांधावरच रोख पैसे मिळत आहेत. परिणामी शेतक-याची आडत, हमाली, व गाडीभाडे तर वाचत आहेच शिवाय, वेळेचीही बचत होत आहे. कोबी शेतातून काढून ती गोणीत भरून त्या गाडीत टाकण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे व्यापारी गावात तरुणांना रोजगारही उपलब्ध होत आहे. दररोज खामखेडा येथून कोबीच्या चार ते पाच गाड्या गुजरात येथील मार्केटसाठी रवाना होत आहेत. गेल्या वर्षी कोबी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नव्हता. तरीही या वर्षी मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड झालेली आहे. सुरूवातील कोबीला चांगल्या पैकी भाव होता. परंतु आता मात्र सर्वसाधारण भाव मिळत आहे.