आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:41 IST2020-07-07T16:40:45+5:302020-07-07T16:41:08+5:30
हा बंद १४ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होतील,

आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने शहरातील सराफ बाजार आठवडाभरसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, त्याला आजपासून सुरुवात होणार आहे. काही व्यापाऱ्यांनी अगोदरच आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील सराफांनी सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने खबरदारीचा उपाय म्हणून बंदचे प्रयोजन केले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या गावठाण असलेल्या पंचवटी, मालेगाव, सराफ बाजार, जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणत गर्दी होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे करोनाच्या रुग्णसंख्येतदेखील झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील असंख्य नागरिक खबरदारी घेत नसल्याने करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. काही दिवसांपूर्वी सराफ बाजारात काम करणाऱ्या काही कारागिरांनादेखील करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले होते. सध्या शहरातील करोनाबाधितांचा आकडा पाहिल्यास धडकी भरते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांनी स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. सराफ बाजाराव्यतिरिक्त उपनगरांमधील सराफ व्यावसायिकही या बंदमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील सोने-चांदी खरेदीचे व्यवहार थंडावणार आहेत. हा बंद १४ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होतील, अशी माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.