उजळला गोदाकाठ : ब्रह्मवृंदांकडून पारंपरिक वेशात आरती

By Admin | Updated: August 7, 2015 00:33 IST2015-08-07T00:33:43+5:302015-08-07T00:33:55+5:30

काशीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गंगाआरती

Bright Goddess: Traditional Vesachi Aarti from Brahmavand | उजळला गोदाकाठ : ब्रह्मवृंदांकडून पारंपरिक वेशात आरती

उजळला गोदाकाठ : ब्रह्मवृंदांकडून पारंपरिक वेशात आरती

नाशिक : रामकुंडाचा परिसर, सायंकाळची वेळ आणि त्यातच प्रज्वलित झालेल्या आरत्यांनी उजळून निघालेला परिसर, निसर्ग चित्रकाराला खुणावेल अशा या वातावरणात टाळ-मृदूंग आणि घंटानादात श्री गंगा गोदावरीची आराधना झाली आणि गोदाकाठी जमलेले शेकडो भाविक नतमस्तक झाले. गोदावरी नदी म्हणजे दक्षिण गंगेची आरती नेहमीच होते; परंतु गुरुवारी काशीच्या ब्रह्मवृंदांनी केलेली ही आरती लक्ष्यवेधी ठरली.
रामकुंडावर असलेल्या गंगा गोदावरी मंदिरात दररोज सायंकाळी गंगाआरती केली जाते. काशीच्या गंगा आरतीचे स्वरूप त्याला प्राप्त व्हावे ही साऱ्यांचीच इच्छा असते; परंतु ते शक्य होत नाही; परंतु गुरुवारी खास काशीहून आलेल्या ब्रह्मवृंदाने थेट नदीपात्रात चौथरे उभारून गोदापात्रातच आरतीच्या निमित्ताने आराधना केली.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने गुरुवारी रामकुंडावर काशीच्या ब्रह्मवृंदांकडून गंगेची तासभर काशी दशाश्वमेध घाटाची प्रसिद्ध महाआरती करण्यात आली. त्यामुळे उपस्थित भाविकांना यावेळी वेगळ्या आरतीची प्रचिती झाली. मोहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठान व जय गोपाल गायत्री सिद्धपीठ यांच्यातर्फे गोदाघाटावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आरतीसाठी गोदातीरी खास व्यवस्था मोहरग्राम विकास शिक्षण प्रतिष्ठान व जयगोपाल गायत्री सिद्धपीठाकडून करण्यात आली होती. काशीचे मुख्य ब्रह्मवृंद रविशंकर शास्त्री यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी जलपूजन करण्यात आले. दरम्यान, संध्याकाळची वेळ असल्याने गोदाघाटावर भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. गंगा आरती केल्याने व आरती पाहिल्यास मोठे पुण्य मिळत असल्याचा दावा या काशीच्या ब्रह्मवृंदांनी यावेळी केला आहे. शंखनाद आरतीच्या सुरवातीला करण्यात आला. आरतीला सहयोगी ब्रह्मवृंद म्हणून अभिषेक शास्त्री, भुपेंद्र शास्त्री, सौरभ शास्त्री उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बबन घोलप, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, विनायक पांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bright Goddess: Traditional Vesachi Aarti from Brahmavand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.