मद्यविक्री नियमांचे उल्लंघन भोवले; तीन वाइन शॉपला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:10 IST2019-10-09T17:07:41+5:302019-10-09T17:10:19+5:30
अवैधरित्या मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी थेट तक्रार करावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

मद्यविक्री नियमांचे उल्लंघन भोवले; तीन वाइन शॉपला टाळे
नाशिक : अनुज्ञप्तीधारक वाइन शॉपचालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन करत मद्यविक्रीचे करणे अपेक्षित आहे; मात्र वेळेच्या अगोदर दुकान उघडून मद्यविक्री करण्यासह अन्य मद्यविक्रीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील तीन मोठ्या वाइन शॉपचालकांवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या वाइन विक्रेत्यांचे व्यवहार तत्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, विधानसभा निवडणूक निर्भिड व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात काही मद्यविक्री करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध मद्याचा पुरवठा करणे नियभंग करणाºया अनुज्ञप्तीविरोधात संबंधितांचा परवाना रद्द अथवा निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांनी दिले आहेत. यानुसार विभागाचे भरारी पथक सतर्क असून अनुज्ञप्तीधारक वाइनचालकांवरही पथकाचा वॉच असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा आदेशान्वये जिल्ह्यातील अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक वसंत कौसडीकर, दुय्यम निरिक्षक योगेश चव्हाण, सी.एच.पाटील, राजेश धनवटे यांच्या पथकाने नियमबाह्य मद्यविकी करत असलेल्या पंचवटी वाइन्स, अमर वाइन्स तसेच नाशिक ब्रॅन्डी हाऊस या तीन दुकानांचे व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये स्थगित केले आहेत. सोमवारी (दि.७) पथकाने रात्री उशिरापर्यंत ही कारवाई पुर्ण केली. पुढील आदेश येईपर्यंत या विक्रेत्यांना मद्यविक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीत आॅनलाइन पध्दतीने मद्यविक्रीची माहिती देणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मद्यविक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवण्याबाबत जिल्ह्यातील सर्व परवानाधारक मद्यविक्रेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तरीदेखील काही मद्यविक्री करणाºया विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. यानुसार भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली. अवैधरित्या मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी थेट तक्रार करावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.