The bodies of five people who drowned in the Valdevi dam were found | वालदेवी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले

वालदेवी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले

ठळक मुद्देएकूण सहा जणांचा बळी : पाच मुलींसह एका मुलाचा समावेश

घोटी : वालदेवी धरणावर शुक्रवारी (दि.१६) वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले नऊ जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यात तिघे बचावले होते तर एका मुलीचा मृतदेह शुक्रवारीच बाहेर काढण्यात आला होता. उर्वरित पाच जण बेपत्ता होते. शनिवारी (दि.१७) राज्य आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या जवानांनी शोधकार्य राबवत पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला आहे. हे सर्व जण नाशिक शहरातील सिडको, पाथर्डी परिसरातील रहिवासी होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सिंहस्थनगर, पाथर्डी फाटा या परिसरातील १० ते २२ या वयोगटातील मुले-मुली शुक्रवारी (दि.१६) सोनी रावसाहेब गमे (१२) हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबई - आग्रा महामार्गावर आठव्या मैलापासून ७ कि. मी. आत असलेल्या वालदेवी धरणावर गेले होते. वाढदिवस आटोपून संपूर्ण ग्रुपचे छायाचित्र घेण्यासाठी सर्वजण पाण्यामध्ये उतरले असता, त्यातील एका मुलीचा पाय घसरल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वच जण खोल खड्ड्यात पडले. त्यात सना वजीर मणियार, समाधान वाकळे व प्रदीप जाधव हे सुदैवाने बचावले. तर शोध पथकाने शुक्रवारी आरती भालेराव (२२) या मुलीचा मृतदेह बाहेर काढला होता. रात्री उशिरा अंधारामुळे अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. शनिवारी सकाळी ६ वाजता धुळे येथून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या जवानांनी धरणात शोधकार्य सुरू केले असता, बुडालेल्या मुला-मुलींचा तासाभरात शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. धरणाचे पाणी संथ असल्याकारणाने बुडालेल्या ठिकाणाच्या २५ ते ३० फुटाच्या अंतरावरच पाचही मृतदेह सापडले. यामध्ये ४ मुली व एका मुलाचा समावेश आहे. हिम्मत ऊर्फ दिनेश राजेंद्र चौधरी(१६) नाजीया वजीर मणियार (१९) , खुशी वजीर मणियार (१०), ज्योती रावसाहेब गमे(१६) आणि सोनी गमे (१२) अशी मृतांची नावे असून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता नाशिक येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मुलांचे मृतदेह पाहून त्यांच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यावेळी मदतकार्य करणाऱ्या स्थानिकांनाही शोक अनावर झाला.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मोहीम
धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या बाबूराव पारस्कर व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हवालदार देवीदास फड, प्रवीण मोरे, श्याम सोनवणे, नीलेश मराठे, प्रवीण भोईर, विनोद चौधरी आदी मोहिमेत सहभागी झाले होते.

 

Web Title: The bodies of five people who drowned in the Valdevi dam were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.