भाजपाचे आता निष्ठावानांना गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:15 IST2019-01-19T00:14:49+5:302019-01-19T00:15:04+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच अशाप्रकारचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाली असली होऊ घातलेल्या निवडणुकांची आचारसंहिता बघता ही पदे कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.

भाजपाचे आता निष्ठावानांना गाजर
नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच अशाप्रकारचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाली असली होऊ घातलेल्या निवडणुकांची आचारसंहिता बघता ही पदे कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.
राज्यातील सत्ताधारी भाजपा केवळ गाजर दाखवतात, अशाप्रकारची टीका विरोधक करीत असताना आता भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांनादेखील पदांचे गाजर दाखविण्यास सुरुवात केल्याची टीका अंतस्थ भाजपातच सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पाच वर्षांपूर्वी विजय झाल्यानंतर अनुकूल वातावरण लक्षात घेतल्यानंतर पक्षात आयारामांची रीघ लागली. परपक्षातून येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यामुळे पक्षातील नेत्यांनी मूळ निष्ठावांना बाजूला सारण्यास सुरुवात केली. पक्ष मोठा करायचा असेल तर बाहेरून येणाऱ्यांना संधी दिली पाहिजे, असे धडे दिल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांना जात, पैसा आणि अन्य कारणांवरून मागे हटविण्यास सुरुवात झाली. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील डावलण्यात आले. त्यामुळे पक्षाशी निष्ठावान परंतु सध्याचे राजकीय वातावरण न मानवलेल्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये दूर राहणेच पसंत केले. संघ प्रतिष्ठान नामक संस्थादेखील अशा निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थापन केली असून, त्या माध्यमातून ते पक्षाला पूरक कामे करीत असतात. तथापि, पाच राज्यांत भाजपाला फटका बसल्यानंतर आता पक्षाला पुन्हा जुने कार्यकर्ते आठवले असून, त्यांना पदे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर आमदारांकडून आणि नेत्यांकडून जुन्या आणि दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांना विविध शासकीय समित्यांपैकी कशावर काम करायला आवडेल, अशा प्रकारची विचारणा केली जात आहे. कोणत्याही समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली तरी एक ते दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार असून, ही निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांतच विधासभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे समित्यांच्या बैठकाही होणार नाही. त्यामुळे पदे मिळवून लेटरपॅड आणि व्हिजिंटिंग कार्डशिवाय त्याला महत्त्व उरणार नाही, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे.
इतक्या वर्षांत
पदे का दिली नाही?
राज्यात सत्ता येऊन आता पाच वर्षे होत आहेत, जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाच होता तर या कालावधीत आठवण का झाली नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून केला जात आहे..