नाशिक : ‘आता लबाडी चालणार नाही, तुकाराम मुंढे हलणार नाही’, ‘शिकार करायला गेलेले शिकारीच झाले शिकार’, जेव्हा वाघ दोन पाऊल मागे टाकतो, याद असावे की तो उंच उडी टाकणार’...अशा शब्दांमध्ये सोशल मीडियावर नेटिझन्सनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधी सत्ताधारी भाजपाने आणलेल्या अविश्वास ठरावाची खिल्ली उडवत तोंडसुख घेतले. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर फेसबुक-व्हाट््सअपच्या माध्यमातून मुंढे समर्थकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुंढे समर्थकांकडून प्रस्ताव दाखल करणाऱ्यांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढविले जात असतानाच मुंढेविरोधकही त्यात मागे नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर शुक्रवारीही (दि.३१) कलगीतुरा रंगला होता. सकाळी-सकाळी मुंढे यांच्याविरुद्ध दाखल केलेले अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची वार्ता झळकली आणि नेटिझन्स पुन्हा एकदा तुटून पडले. मुंढे यांनी करकपात करत माघार घेतल्याने अविश्वास प्रस्ताव मागे घेतला जाणार असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. त्याबाबतही सोशल मीडियावर सत्ताधाºयांना पुढील वाटचालीची जाणीव करुन देण्यात आली. ‘चूल झालीय बंद, नुसताच धूर झालाय, उपासमारीने समस्यांचा पोटशूळ उठला’ तसेच ‘लोकप्रतिनिधींना माघारी बोलविण्याचा कायदा असता तर नाशिककरांनी नगरसेवकांना माघारी बोलाविले असते’ अशा शब्दांतही आपल्या भावना व्यक्त झाल्या आहेत.उरात आणखी धडकी...‘जेव्हा वाघ दोन पाऊल मागे टाकतो, याद असावे की तो उंच उडी टाकणार’ असे लिहीत मुंढे यांची पुढील कारकीर्द ही नगरसेवकांच्या उरात आणखी धडकी भरवणारी असणार, असे दर्शविण्यात आले आहे. याशिवाय, ‘नशीब मुख्यमंत्र्यांचा विश्वास जागृत झाला आणि अविश्वास मागे घेण्याचा आदेश आला’ असे म्हणत भाजपाची खिल्ली उडविली आहे.
सोशल मीडियावर मुंढे समर्थकांकडून भाजपाची खिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:30 IST