गर्भगळीत राष्टवादीला दिली भाजपाने संजीवनी ! 

By श्याम बागुल | Published: October 8, 2019 06:53 PM2019-10-08T18:53:04+5:302019-10-08T18:59:08+5:30

शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही नाकारू शकत नाही.

BJP gives Sanjeevani to the unruly NCP! | गर्भगळीत राष्टवादीला दिली भाजपाने संजीवनी ! 

गर्भगळीत राष्टवादीला दिली भाजपाने संजीवनी ! 

Next
ठळक मुद्दे गेल्या वीस वर्षांत लढवय्या भूमिकेत असलेल्या राष्टवादीच्या भवितव्याची चर्चाराजकीय खेळी खेळत राष्टवादीचे निर्णायक क्षणी सत्ताधा-यांना धक्के

श्याम बागुल
नाशिक : लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात सपाटून पराभव झाल्यानंतर गर्भगळीत झालेली राष्टÑवादी कॉँग्रेस विधानसभा निवडणुकीला कसे सामोरी जाईल, असा प्रश्न खुद्द पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पडलेला असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे तर राष्टÑवादीच्या राजकीय भवितव्याची चिंता व्यक्त होवू लागली. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाशकात झालेले थंड स्वागत व काही मतदारसंघात पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याचे निर्माण झालेले चित्र पाहता, निवडणुकीपूर्वी पराभूत मानसिकतेत असलेल्या राष्टÑवादीला अखेर भाजपनेच संजीवनी दिली आहे. ऐन निवडणुकीत भाजपाच्या नाराज व बंडखोरांनी अन्य पक्षाऐवजी राष्ट्रवादीला पसंती दिल्याने पक्षाला आयतेच बळ मिळाले असून, या बळावरच कॉँग्रेस आघाडी आता जिल्ह्यातील पंधरा पैकी दहा ते बारा जागांवर विजयाचा दावा करू लागली आहे.


शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही नाकारू शकत नाही. विरोधकांना बळ देऊन स्वत:चे पक्षात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्याची कॉँग्रेसी संस्कृती यासाठी कारणीभूत ठरली. परिणामी आज तीच भूमिका कॉँगे्रस आघाडीला अडचणीची झाली आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर राष्टÑवादीला व पर्यायाने कॉँग्रेस आघाडीला दणकून पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कॉँग्रेसपेक्षा राष्टÑवादीच्या राजकीय भवितव्यावरच अधिक चर्चा होवू लागली. कॉँग्रेसने कधीच आपली विजयाची मानसिकता पराभवात बदलली आहे. परंतु पक्ष स्थापनेपासून गेल्या वीस वर्षांत लढवय्या भूमिकेत असलेल्या राष्टÑवादीच्या भवितव्याची अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत चर्चा होणे पक्षाला हिताला धरून नसल्याचे पाहून अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाणे पसंत केले तर काहींनी कुंपणावर उभे राहत स्वत:च्या राजकीय फायद्याचा विचार करत पक्षापासून दोन हात दूर राहणे पसंत केले. पदाधिकाऱ्यांची पराभूत मनोवृत्ती, वरिष्ठ नेत्यांच्या तळ्यात-मळ्यातील भूमिकेमुळे कार्यकर्ते सैरभैर झालेले असताना होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीला सक्षम उमेदवार तरी मिळतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा पक्षाला संजीवनी देऊन गेला. जनमत पक्षाच्या बाजूने उभे राहताना दिसताच राष्टÑवादीने त्याचा पुरेपूर फायदा उचलला व सत्तेच्या धुंदीत मस्त असलेल्या सत्ताधा-यांना एकामागोमाग धक्केदिले. त्याची सुरुवात सिन्नर मतदारसंघातून केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी केलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीने गळास लावले व थेट उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घातली व त्यानिमित्ताने एका खेळीत शिवसेना व भाजपा अशा दोघांनाही झटका दिला. सत्ताधारी या झटक्यातून सावरत नाही तोच, नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांना मिळत असलेली सहानुभूती पाहून रातोरात राष्टÑवादीने राजकीय खेळी करत सानप यांना आपलेसे केले व उमेदवारी बहाल करून पूर्व मतदारसंघात पक्षाचे स्थान बळकट केले. सिन्नरमध्ये मराठा व पूर्वमध्ये वंजारी उमेदवार देऊन राष्टÑवादीने जिल्ह्यातील इतर तेरा विधानसभा मतदारसंघासाठी बिदागी गोळा केली. मालेगाव बाह्य मतदारसंघातून हिरे कुटुंबीयांनी उमेदवारी करण्यास नकार दिल्याचे पाहून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्यासाठी जागा सोडून पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली, तर बागलाणमधील जागा धोक्यात असल्याचे लक्षात आल्यावर मराठा समाजाला शरद पवार यांच्यावर सत्ताधाºयांकडून केला गेलेला अन्यायाची जाणीव करून देण्यात आली. कळवण मतदारसंघातील प्रादेशिक वाद पाहता मित्रपक्ष माकपाबरोबर मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवून स्व. ए. टी. पवार यांच्या पुण्याईचा फायदा घेण्यासाठी त्यांचे पुत्र नितीन पवार यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात पाय रोवण्याचा प्रयत्न केला. तशीच खेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात ऐनवेळी खेळण्यात आली. माकपला अगोदर पाठिंबा देणाºया राष्टÑवादीने भाजप-सेनेत बंडखोरी झाल्याचे पाहून या मतदारसंघातून गेल्या काही वर्षांपासून तयारी करणारे डॉ. अपूर्व हिरे यांना नामांकनाच्या अखेरच्या दिवशी ए व बी फॉर्म देऊन पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचविण्यास सुरुवात केली. दिंडोरीत उमेदवारी न मिळाल्याने सेनेच्या नाराजांची भूमिका राष्टÑवादीच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसू लागली असताना इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून आपल्याच पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांना कॉँग्रेसमध्ये पाठवून पक्षाकडून उमेदवारीही मिळवून दिली व सेना उमेदवाराच्या विरोधातील नाराजीचा फायदा उचलण्याची पुरेपूर संधी साधून घेतली. देवळालीत शिवसेनेच्या घोलप यांच्या विरोधातील ‘अ‍ॅन्टिइन्कमबंसी’चा लाभ उठविण्यासाठी भाजपाच्या नगरसेविका सरोज अहिरे यांना पक्ष प्रवेश देऊन युतीला पुन्हा धक्का दिला.
एकामागोमाग राजकीय खेळी खेळत राष्टÑवादीने निर्णायक क्षणी सत्ताधा-यांना धक्के देत पक्षाला तर संजीवनी दिलीच परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जिल्ह्यात आपली प्रतिमा पुन्हा नव्याने उभी केली. विधानसभेच्या मतदानाला अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात राष्टÑवादी अजून काय खेळी खेळेल हे गुलदस्त्यात असले तरी, सत्ताधारी पक्षांतील बेदीलीचा लाभ राष्टÑवादी उचलणारच नाही, असे म्हणता येणार नाही.

Web Title: BJP gives Sanjeevani to the unruly NCP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.