नाशिक : रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत सुरू असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र येत्या १ मे अर्थात महाराष्ट्रदिनी नाशिकला होणाऱ्या कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झेंडावंदन होणार आहे, तर पालकमंत्रिपदाचे दुसरे दावेदार असलेल्या दादा भुसे यांना अमरावती जिल्ह्यात झेंडावंदनाची जबाबदारी देऊन एक प्रकारे पालकमंत्रिपदावरील त्यांचा दावा कोणतेही भाष्य न करता डावलला गेल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद थेट भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारीदेखील गेला होता; पण त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यानंतर आता १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी कोणता मंत्री कुठल्या जिल्ह्यात झेंडा फडकवणार त्याची यादी समोर आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गिरीश महाजन यांना नाशिकच्या झेंडावंदनाचा मान मिळाल्याने एक प्रकारे पालकमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात टाकण्याचे संकेत देण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे दादा भुसे अर्थात शिंदेसेना हा महायुतीतील महत्त्वाचा घटक नाराज होण्याची शक्यता असून, त्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा वाढतच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित मे महिन्यात या नाराजीचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.