BJP fears ahead of Mayor elections | महापौर निवडणुकीच्या आधीच भाजपात खदखद
महापौर निवडणुकीच्या आधीच भाजपात खदखद

ठळक मुद्देनाराजी : जाहीर टीकेमुळे रंगले राजकारण

नाशिक : भाजपात आधीच असलेली गटबाजी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पक्षाने दणका दिल्यानंतर झालेली फाटाफूट आणि आता राज्यात सत्तेविषयी शंका असतानाच पक्षातील अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली आहे. विशेषत: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी तीन वर्षातील कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्ट केल्याने ऐन महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भाजपचे महापालिकेत बहुमत आहे. तथापि, सत्तेची फळे मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी चाखल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे. नगरसेवक निधी मंजूर होऊन सुद्धा त्याची कामे रखडली आहेत. छोटी छोटी कामे होत नसल्याने नव्या नगरसेवकांची तीव्र नाराजी आहे. महापालिकेत महापौर म्हणून रंजना भानसी यांच्याकडे नेतृत्व आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. माजी आमदार बाळासाहेब सानप आणि त्यांच्या हाती महापालिकेची सूत्रे होती. परंतु नगरसेवकांकडे लक्ष पुरवले गेले नाही. त्यामुळे महापालिकेतील सत्तेला तीन वर्षे पूर्ण होत असतानाही कामे होत नसल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. शुक्रवारी (दि.८) भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत या मर्मावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील बागुल यांनी बोट ठेवले आणि तीन वर्षांत नगरसेवकांना निधी मिळाला नाही आणि समाधानकारक काम झालेले नाही, असे त्यांनी जाहीरपणे महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीतच सुनावले.
पुढील महिन्यात महापौरपदाची निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असतानादेखील शिवसेना महापौरपदावर डोळा ठेवून समीकरणे जुळवण्याची तयारी करीत आहेत. भाजपने नाकारलेल्या माजी आमदार सानप यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्यातच महापालिकेचा गेल्या पंचवीस-तीस वर्षातील लोकनियुक्त कारकिर्दीचा इतिहास तपासला तर शेवटच्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात फाटाफूट होते. अशा स्थितीत प्रदेश उपाध्यक्ष बागुल यांच्या विधानामुळे पक्षांतर्गत नाराजीला फुंकर घातली गेली आहे.
भाजपातील नाराजी ही नवीन नाही. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवली ही एक नाराजी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाचे गटनेते जगदीश पाटील यांनी महासभेच्या ठरावात घुसखोरीवरून माजी आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.

Web Title: BJP fears ahead of Mayor elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.