क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:04 IST2025-12-16T15:01:34+5:302025-12-16T15:04:10+5:30
राज्याचे क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. १६) सुनावली.

क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
नाशिक : राज्याचे क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. १६) सुनावली. शिक्षेची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एम.बदर यांनी अतिरक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडीया यांना दिले आहेत.
यामुळे त्यांच्या न्यायालयाकडून आरोपी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना कधीही अटकेचे समन्स बजावले जाऊ शकते. सदनिका घोटाळा कोकाटे बंधूंना अखेर भोवला. यापूर्वी नरवाडिया यांच्या कोर्टाने दिलेला निकाल सत्र न्यायालयानेही कायम ठेवला आहे.
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरसारख्या मोक्याच्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्याअधारे फसवणूक करून चार सदनिका हडपल्याच्या आरोपाखाली कोकाटे बंधूंविरूद्ध खटला सुरू होता.
आरोपी माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू आरोपी विजय कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नरवाडिया यांच्या न्यायालयाला आदेशित करत शिक्षेच्या निकालाची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. यामुळे कोकाटे बंधू यांना अटक करण्याचे समन्स न्यायालयाकडून काढले जाईल, असे ॲड.सुधीर कोतवाल यांनी माहिती देताना सांगितले.
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
नेमकं प्रकरण काय?
१९९५ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.
याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण १९९७ पासून सुरु होते . यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. या प्रकरणी आता कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.