चांदोरी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:49 IST2019-06-04T15:48:49+5:302019-06-04T15:49:41+5:30
चांदोरी : येथे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग पथक आणि चांदोरीचे नागरिक यांच्या प्रयत्नाने जीवदान देण्यात यश आले.

चांदोरी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
चांदोरी : येथे मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग पथक आणि चांदोरीचे नागरिक यांच्या प्रयत्नाने जीवदान देण्यात यश आले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास उसाच्या क्षेत्रात लपून असलेला बिबटया भक्षाचा पाठलाग करताना चांदोरी शिवारातील भोज वस्ती येथे नानासाहेब कोरडे यांच्या विहिरीत पडला. कोरडे हे मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील विहिरिकडे पंप सुरु करण्यासाठी आले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी योगेश सोनवणे, ज्ञानेश्वर कोरडे, प्रविण कोरडे यांना बोलावून घेतले या सर्वांनी दोरखंडाला लाकडी बाज बांधून ती विहिरीत सोडली. या बाजेवर बिबट्या जाऊन बसला. चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख यांनी घटनेची माहिती वनविभाग व सायखेडा पोलिस ठाणे यांना दिली. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी संजय भंडारी , वनपाल जी बी वाघ ,वनसेवक विजय टेकणर , वनसेवक भय्या शेख आदींचे पथक तातडीने कोरडे यांच्या शेतात दाखल झाले. वन विभागाने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला.त्यानंतर बिबट्यास पिंजर्याच्या साहायाने विहिरीबाहेर काढण्यात आले.या बिबट्यास निफाड येथे वन विभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.