ऊसशेतीत आढळला बिबट मादी बछडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:44 IST2020-06-01T13:41:33+5:302020-06-01T13:44:55+5:30
या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत.

ऊसशेतीत आढळला बिबट मादी बछडा
नाशिक : येथील पाथर्डी गावापासून पुढे दीड किलोमीटर अंतरावर गौळाणे रस्त्याला लागून असलेल्या यशवंतनगरमधील कोंबडे मळ्यातील एका ऊसाच्या शेतात तोडणीदरम्यान बिबट्याचा एक बछडा कामगारांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक वन्यजीवप्रेमींसह मळ्यात दाखल झाले.
गौळाणे रस्त्यालगत यशवंतनगर चा मळे परिसर आहे. येथील कोंबडे मळ्यात एका नैसर्गिक नाल्याच्या वरील बाजूस असलेल्या ऊसशेतीमध्ये ऊसतोडणी नेहमीप्रमाणे सुरू होती. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात कामगार ऊस कापत असताना वावरात त्यांना बछडा नजरेस पडला. याबाबतची माहिती त्यांनी शेतीमालक संजय शिवाजी कोंबडे यांना दिली. त्यांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संपर्क साधून याबाबत कळविले.
या भागातील मळे परिसरात बिबट मादीचा संचार असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतमजुरांना व मालकांना सावधगिरी बाळगत सुर्यास्तापुर्वी शेतीतून घरी सुरक्षित जाण्याच्या सुचना दिल्या आहेत.
‘खबरदारी घ्या, सतर्कता बाळगा...’
आज ढगाळ हवामान असल्यामुळे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास यशवंतनगरमधील तसेच आजुबाजुच्या परिसरातील सर्व मळ्यांमधील शेतमजुर वर्गाने बांध सोडावा तसेच मळ्यालगत वस्तीवर राहणाऱ्या रहिवाशांनी आपआपल्या लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवावे, संध्याकाळी कोणीही बाहेर पडू नये, पशुधनदेखील सुरक्षित ठिंकाणी बंदिस्त करावे, बिबट मादी नजरेस पडल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, अशा विविध सुचना गस्तीपथकाकडून वाहन फिरवून ध्वनिक्षेपकामार्फत परिसरात देण्यात आल्या.