शहीद जवानाच्या स्मारकाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 11:22 PM2021-11-02T23:22:38+5:302021-11-02T23:28:10+5:30

गोंदे दुमाला : देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो असल्याचे प्रतिपादन इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय कातोरे यांनी तालुक्यातील गेल्या २९ वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या शहीद जवान राजेंद्र धोंडू भले यांच्या तालुक्यातील पहिल्याच स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.

Bhumi Pujan of Martyrs' Memorial | शहीद जवानाच्या स्मारकाचे भूमिपूजन

इगतपुरी तालुक्यातील शहीद झालेल्या जवान राजेंद्र भले यांच्या स्मारक भूमिपूजनप्रसंगी पांडुरंग गांगड, पी. यू. चौधरी समवेत विजय कातोरे, सोमनाथ जोशी, पांडुरंग वारुंगसे, तुकाराम काजळे, ॲड. मारुती आघान आदी.

Next
ठळक मुद्देकातोरे : सीमेवर रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो

गोंदे दुमाला : देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो असल्याचे प्रतिपादन इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय कातोरे यांनी तालुक्यातील गेल्या २९ वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या शहीद जवान राजेंद्र धोंडू भले यांच्या तालुक्यातील पहिल्याच स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव पी. यू. चौधरी, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद बस्ते, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे आदींसह माजी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस सभापती सोमनाथ जोशी यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अहोरात्र सीमेवर देशाचे रक्षण केलेल्या शहीद जवानांना व त्यांच्या कार्याला लोकप्रतिनिधी विसरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव चौधरी यांनी सांगितले.
आज शहीद झालेल्या जवानांचे स्मारक उभारण्यासाठी कोणी पुढे येत नसल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शहीद जवान राजेंद्र धोंडू भले हे २ नोव्हेंबर १९९३ साली नागालँड येथे ऑपरेशन रक्षकमध्ये आतंकद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. यानंतर २८ वर्ष उलटून गेले तरी या वीर जवानाचे शहीद स्मारक उभे राहिले नाही. याची खंत खैरगाव भागातील ग्रामस्थांसह खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण यांना वाटली.

स्मारक उभे राहावे यासाठी ह्या सर्वांनी माजी सैनिक संघटनेचे इगतपुरी तालुका कार्याध्यक्ष आणि माजी सैनिक विजय कातोरे यांना साकडे घातले. त्यानुसार माजी सैनिक संघटना आणि खैरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने माजी सैनिकांनी धाव घेत नियोजनबद्ध पद्धतीने आज तालुक्यातील लोकप्रतिनिधी व माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन पार पाडले.
लवकरच इगतपुरी तालुक्यातील पहिले शहीद स्मारक म्हणून खैरगाव येथील शहीद जवान राजेंद्र भले यांचे भव्य दिव्य स्वरूपात २६ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येईल असे यावेळी माजी सैनिक विजय कातोरे यांनी यावेळी सांगितले. शहीद जवानांच्या कार्याचा विसर पडू नये, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबांचे प्रश्न सोडवणे, आदीं कामे तालुक्यात माजी संघटनेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग गांगड, उपसभापती विठ्ठल लंगडे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, संपतराव काळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, अण्णासाहेब डोंगरे, माजी सैनिक तुकाराम काजळे, राजेंद्र मुसळे, सुनील गुळवे, सोपान मुसळे, गजानन पळशीकर, यादव पटेकर, श्रावण फासगे, भगवान सहाणे, गोपीनाथ साबळे, शांताराम सहाणे, रवींद्र शार्दुल, किसन हंबीर, मणीराम मदगे, उपाध्यक्ष शांताराम सहाणे, विठ्ठल मेंगाळ, किरण वाजे, सुनील भले, शहीद जवान पत्नी वीर नारी गंगूबाई भले, वीर नारी ललिताबाई भले, पद्मिनी चव्हाण, आदी उपस्थित होते. गुणाजी गांगड, प्रकाश भले, शिवाजी शिद, काशीनाथ सावंत, महादू गांगड, कावजी भले, अशोक भले, सरपंच ॲड. मारुती आघाण, उपसरपंच गणेश गायकर आदींसह खैरगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title: Bhumi Pujan of Martyrs' Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.