Bhujbal's visit to BJP's Vasant Gitan | भुजबळ यांची भाजपच्या वसंत गितेंनी घेतली भेट
भुजबळ यांची भाजपच्या वसंत गितेंनी घेतली भेट

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक परपक्षांतील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच पक्षातील ओबीसी नेते नाराज असल्याचीदेखील चर्चा सुरू असतानाच सोमवारी (दि.९) राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली आणि आशीर्वादही घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे गिते यांनी ज्येष्ठत्वाच्या जोरावर भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चादेखील सुरू झाल्या आहेत.
राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर छगन भुजबळ सोमवारी (दि.९) प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्टÑवादी आणि कॉँग्रेसबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यातच भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी ही हजेरी लावल्याने राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरला. वसंत गिते हे शिवसेनेत कार्यकर्ता असल्यापासून त्यांचे
आणि छगन भुजबळ यांचे चांगले संबंध आहेत. गिते यांनी शिवसेनेनंतर मनसेत प्रवेश करून राज ठाकरे यांना साथ दिली. प्रदेश सरचिटणीसपदावर काम करताना ते मनसेचे आमदारही झाले. त्यानंतर महापालिकेत मनसेची सत्ताही आली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी बिनसल्यानंतर गिते भाजपवासी झाले.
भाजपने २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते यांना उमेदवारी तर दिलीच शिवाय अनेक ज्येष्ठांना डावलून त्यांना उपमहापौरपददेखील दिले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वसंत गिते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी नाकारण्यात आली आणि या मतदारसंघात विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनाच पक्षाने संधी दिली. तेव्हापासून गिते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भुजबळ यांच्या भेटीमागे या नाराजीचे वलय असल्याचीदेखील चर्चा आहे. अर्थात, गिते यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती. तसेच त्यांचे आशीर्वाददेखील घेतले. भुजबळ यांच्याशी आपले पक्ष विरहित नाते असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विधानसभा निवडणुकीपासून वसंत गिते काहीसे नाराज आहेत. भुजबळ यांच्या भेटीमागे या नाराजीचे वलय असल्याचीदेखील चर्चा आहे. अर्थात, गिते यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती. तसेच त्यांचे आशीर्वाददेखील घेतले. भुजबळ यांच्याशी आपले पक्ष विरहित नाते असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Web Title:  Bhujbal's visit to BJP's Vasant Gitan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.