भुजबळ सेनेत जाणार: समता परिषदेचे काय होणार?
By श्याम बागुल | Updated: September 3, 2019 15:43 IST2019-09-03T15:39:21+5:302019-09-03T15:43:30+5:30
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची

भुजबळ सेनेत जाणार: समता परिषदेचे काय होणार?
श्याम बागुल
मागासवर्गीयांना नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक सुबत्तेला हातभार लावणाऱ्या मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करावी या एव्हढ्या एकमेव कारणास्तव शिवसेनेशी व पर्यायाने सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेणा-या छगन भुजबळ यांनी आपल्या याच भूमिकेच्या पाठपुराव्यासाठी २८ वर्षापुर्वी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. इतर मागासवर्गीयांची देशपातळीवर मोट बांधण्यात यशस्वीही झाले आज पुन्हा बदललेल्या राजकीय समिकरणातून भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या होत असलेल्या चर्चा पाहता, त्यांच्या संभाव्य सेना प्रवेशानंतर समता परिषदेचे काय होणार या प्रश्नाचे सध्या उत्तर सापडणे मुश्किल झाले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची ताकद दाखवून दिली व पुढे हीच ताकद त्यांच्या राजकारणातील सुलभ वावराला कामी आली. आक्रमक व अभ्यासू नेतृत्वगुणामुळे इतर मागासवर्गीयांमधील अन्य जातींनाही भुजबळ हे आपले नेते वाटू लागल्याने परिणामी महाराष्टÑात समता परिषदेचे लावलेले रोपटे बिहार, राजस्थान, दिल्ली, झारखंड, गोवा आदी राज्यांमध्ये झपाट्याने बहरले. प्रत्येक राज्यातील ओबीसी नेत्यांचे संघटन उभे करून त्यांना आपल्यामागे व पर्यायाने समता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यात भुजबळ यशस्वी झाले. परिणामी त्यांच्या या राष्टÑव्यापी नेतृत्वाचा राजकीय वाटचालीत मोठा फायदा झाला. महाराष्टÑातील राजकीय वर्तुळात ज्या ज्या वेळी भुजबळ अडचणीत आले त्या त्यावेळी समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद दाखवून राजकीय इप्सित साध्य करून घेतले. राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणा-या भुजबळ यांनी देखील ओबीसींच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेवून त्यांच्या न्याय, हक्कासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. अर्थात ओबीसींचे नेतृत्व करतांना बहुसंख्य समाजाकडून भुजबळ यांना टार्गेट करण्याचे काम नेहमीच करण्यात आले व त्याच्या शिक्षाही त्यांनी भोगल्या. आता मात्र पुन्हा एकदा भुजबळ यांची पावले शिवसेनेच्या दिशेने पडू लागल्याच्या वार्ता वाºयाच्या वेगाने पसरू लागल्या आहेत. अशा वार्ता व होणाºया चर्चांचा राजकीय अंदाज घेत भुजबळ पुढचे आडाखे बांधू लागले आहेत. प्रसंगी अशा वार्तांचे कधी खंडण तर कधी अशा वार्ता पसरतील याची पद्धतशीर काळजीही घेतली जात आहे. भुजबळ शिवसेनेत जातील किंवा जाणारही नाहीत, परंतु ज्या ओबीसींच्या बळावर त्यांनी राजकीय शिखरे पादाकांत केली त्या समता परिषदेचे काय हा प्रश्न त्यांच्या देशभरातील समता सैनिकांना पडला आहे. ज्या कारणावरून शिवसेनेतून बाहेर पडून समता परिषद जन्माला घातली ती परिषद सेनेत जावून अबाधित राहणार की विसर्जित करणार ? सेनेत विलीन करणार की तिचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार असे एक नव्हे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक मात्र खरे शिवसेनेला स्वत:च्या पक्ष संघटनेशिवाय अन्य कोणतीही समांतर संघटनेचे अस्तित्व मान्य होत नाही हे भुजबळ यांच्यासारख्या पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकाला चांगलेच ठावूक आहे. आजही भुजबळ पुन्हा शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्यास तयार असतील तर त्यामागची कारणे व त्यांचे शिवसेनेतील स्थान याबाबतचा अंदाज मुरब्बी राजकारणी म्हणून निश्चितच बांधला असेल.