भारमला आरोग्य खात्याची इमारत सेवेत रुजू
By Admin | Updated: October 25, 2016 00:16 IST2016-10-25T00:16:04+5:302016-10-25T00:16:26+5:30
येवला : डोंगरगाव, तळवाडे, अंगुलगाव आदि गावांना मिळणार सेवा

भारमला आरोग्य खात्याची इमारत सेवेत रुजू
येवला : भारम येथील आरोग्य केंद्राची इमारत ग्रामस्थांच्या सेवेत लवकरच रूजू होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. राजापूर गटात एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने भारम, राजापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अंदरसूल, येवला, नांदगाव, वैजापूर येथे आरोग्याची सुविधा घेण्यासाठी जावे लागत होते. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता राजापूर गटात भारम व राजापूर येथे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. राजापूर आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ५० लाख व भारम आरोग्य केंद्रासाठी एक कोटी ५० लाख, देवठाण उपकेंद्रासाठी १ कोटी २५ लाख, भुलेगाव उपकेंद्रासाठी १८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झाली आहे. शासनाकडे पदे मंजूर होण्यासाठी तसेच राजापूर व भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पदे मंजुरीसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. आरोग्य सचिवाकडे दोन वर्षांपासून जिल्हा परिषदमार्फत शासनाकडून विविध सेवा व पदे मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
परंतु शासनाने यासंबंधी निर्णय न घेतल्यामुळे इमारती पूर्ण होऊनसुद्धा नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून भारम हे प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाचा पदे मंजूर होईपर्यंत पर्यायी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपलब्ध करून हे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यासंबंधी ७ आॅक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. जिल्हा आरोग्या-धिकारी यांनी अंमलबजा-वणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)