भजनांनी दुमदुमले विठ्ठल-रुखमाई मंदिर
By Admin | Updated: July 28, 2015 01:36 IST2015-07-28T01:33:43+5:302015-07-28T01:36:16+5:30
महिला भजनी मंडळ : खोडेनगरला सोहळा

भजनांनी दुमदुमले विठ्ठल-रुखमाई मंदिर
वडाळागाव : येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर आषाढी एकादशीनिमित्त भजनांनी दुमदुमले होते. परिसरातील महिला भजनी मंडळाने मंदिरात एकत्र येऊन विविध भजन सादर करत विठू नामाचा गजर केला. तसेच संध्याकाळी अभंगवाणीचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
सालाबादप्रमाणे यावर्षीही विठ्ठल-रुखमाई चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आषाडी एकादशी सोहळा वडाळा शिवारातील खोडेनगर येथील विठ्ठल- रुखमाई मंदिरात मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरामध्ये विठ्ठल-रुखमाई यांच्या मूर्तींची महापूजा व अभिषेक विजय हाके यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. सकाळी आरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार वसंत गिते, संगीता गिते, सुनील खोडे, संगीता खोडे, सिंधू खुटे, शांताबाई विधाते, जनाबाई मुरडनर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
वडाळा-डीजीपीनगर शिवारातील खोडेनगर येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर एकमेव मंदिर आहे. परिसरातील विठुरायांचे भक्त मोठ्या संख्येने मंदिरात नियमित दर्शनासाठी हजेरी लावतात. आषाढीनिमित्त मंदिराची रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम आठवड्याभरापासून सुरू होते. संपूर्ण काळ्या रंगाचे हे आकर्षक मंदिर लक्षवेधी आहे.
संध्याकाळी आमदार देवयानी फरांदे व प्रा. सुहास फरांदे यांच्या हस्ते पूजा महाआरती करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या वतीने मंदिराला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. रात्री मंदिराच्या आवारात अनघा जोशी भजनी मंडळाच्या वतीने अभंगवाणी हा भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. आज दिवसभर मंदिरामध्ये फळांचा महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. मंदिर परिसरात उपवासाच्या पदार्थांची दुकाने थाटली होती.