NCP Chhagan Bhujbal: "राज्यपाल हे पद खूप मोठे आहे. मी त्या पदाचा अवमान करत नाही. मात्र, माझे काम हे गोरगरिबांचे कल्याण करण्याचं आहे. राज्यपाल झालो तर मी भटक्या, विमुक्तांसह अन्य समाजाचे काम करू शकणार नाही. राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखं आहे," अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानंतर बरीच उलथापालथ सुरू असून, या सर्व प्रक्रियेत दीड महिना उलटला. तरीदेखील भुजबळ यांनी नुकताच राज्यपाल पदाला नकार देत ओबीसी नेतृत्वाच्या संघर्षपथावर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. त्यानंतर १५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात राष्ट्रवादीकडून भुजबळ यांचे नाव नव्हते. त्यामुळे भुजबळ समर्थक तसेच समता परिषदेचे मेळावे, आंदोलने झाली. अगदी शिर्डीच्या पक्षीय मेळाव्यात भुजबळ यांची अल्पकाळ उपस्थितीदेखील चर्चेचा विषय ठरली होती.