नर्मदा आंदोलकांचे आंदोलन मागे

By Admin | Updated: April 18, 2015 23:43 IST2015-04-18T23:29:26+5:302015-04-18T23:43:35+5:30

मेधा पाटकर : जल व जमीन हक्क सत्याग्रह

Behind the movement of Narmada protesters | नर्मदा आंदोलकांचे आंदोलन मागे

नर्मदा आंदोलकांचे आंदोलन मागे

नाशिकरोड : शासनाने २८ एप्रिल ते १६ जून दरम्यान जमीन दाखविण्याचा सादर केलेला कार्यक्रम नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रतिनिधींनी मान्य केला. रोजगार हमी आणि रेशन घोटाळ्याची चौकशी करण्याचे शासनाने मान्य केल्याने शनिवारी दुपारी नर्मदाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान पावसाळ्यात प्रकल्पग्रस्तांची जीवित व वित्तहानी झाल्यास जल व जमीन हक्क सत्याग्रह करण्याची घोषणा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली.
नर्मदा बचाव आंदोलकांनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बुधवारी दुपारी अचानक कुठलीही पूर्वसुचना न देता विभागीय आयुक्त कार्यालयात नर्मदा प्रकल्पबाधित पुनर्वसनाच्या प्रश्नावरून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गुरूवारी साडेआठ तास विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यासोबत बैठक होऊन जमीन दाखविण्याच्या कार्यक्रमाबाबत आंदोलकांचे एकमत न झाल्याने आंदोलन सुरूच होते. शुक्रवारी देखील शासनासोबतची बोलणी फिसकटली होती.
ठिय्या आंदोलनाच्या शनिवारी चौथ्या दिवशी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यासोबत नर्मदा आंदोलनाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. नर्मदा आंदोलनाच्या प्रतिनिधींनी २७ एप्रिल ते १९ मे पर्यंत जमीन दाखवणे कार्यक्रम प्रस्ताव दिला होता. याबाबत डवले यांनी २८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत जमीन दाखवणे कार्यक्रम प्रस्ताव आंदोलकांच्या प्रतिनिधींना दिला. त्या प्रस्तावाबाबत आंदोलकांच्या प्रतिनिधींनी जेथे वस्ती आहे तेथे ७ जूनपर्यंत जमीन दाखविणे कार्यक्रम घ्यावा व त्यानंतर पावसाळा सुरू होत असल्याने जेथे वस्ती नाही अशा ठिकाणी १६ जूनपर्यंत जमीन दाखविणे कार्यक्रम घ्यावा अशी सूचना केली. यावर शासन व आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात एकमत झाल्याने गेल्या चार दिवसापासून जमीन दाखवण्याच्या मुद्यावरून फिसकटलेली बोलणी यशस्वी झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेल्या आरोपाची विभागीय चौकशी करण्याचे डवले यांनी मान्य केले. तसेच गाव, पंचायत व तालुका पातळीवर सोशल आॅडीट करून जुनच्या प्रारंभी जनसुनावणी करण्यात येईल. रेशनिंग घोटाळ्याच्या चौकशीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर तक्रार निवारण मंच स्थापण्याचे मान्य करण्यात आले.
अंत्योदय व घरपोच धान्य योजना सुरू करावयाची असल्यास येत्या १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत बहुमताने निर्णय झाल्यास त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी मान्य केले. वनगावांचे महसुलीकरण, वनजमिनी मोजणी, घोषित व अघोषित प्रकल्पग्रस्तांची प्रक्रिया त्वरीत सुरू करणे आदि प्रश्नांवर समाधानकारक चर्चा झाली.
सत्यवादी शपथपत्र द्या
नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या की, जमीन दाखवण्याच्या कार्यक्रमाबाबत २२० हेक्टर एवढीच जमीन शिल्लक आहे. ती कशी वाटणार, जमीन कमी पडल्यास खासगी जमीन घेणार का, किती जणांचे पुनर्वसन बाकी आहे याबाबत शासनदरबारी गोंधळ आहे. प्रकल्पग्रस्त चार दिवसात नोटरी शपथपत्र सादर करतील. शासनाने सत्यवादी शपथपत्र सादर करावे अशी मागणी पाटकर यांनी केली. तापी-नर्मदा मध्यम जोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याचा डाव असल्याचा आरोप पाटकर यांनी यावेळी केला. प्रकल्पाच्या बोगदा, बंधारा आदि कामाला ग्रामसभेची मंजुरी न घेतल्यास ही कामे करू न देण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
नर्मदा प्रकल्पाशी तीन राज्यांचा संबंध आहे. आपली ३३ गावे डुबत असतांनाही महाराष्ट्राला प्रकल्पातुन वीज किंवा पाणी मिळत नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी ४२ कोटींचा हा प्रकल्प १० हजार कोटींवर नेण्यात आला आहे. उद्योजकांच्या फायद्यासाठीच धरणाची उंची वाढविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच याला कारणीभूत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Behind the movement of Narmada protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.