लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे.जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ७० ते ८५ टक्केइतके पाणी साठले आहे. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून धरणांमध्ये त्याच्या साठवण क्षमतेइतके पाणी साठविण्याचे नियोजन असले तरी, काही विशिष्ट प्रमाणात धरणांमध्ये पाण्यासाठी जागा शिल्लक ठेवावी लागत असल्याने जिल्ह्यातील दारणा, पालखे, कडवा, भोजापूर, आळंदी या पाच धरणांमधून गेल्या दहा दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठा झाल्यामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला, परंतु गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. दारणा धरणात ९१ टक्के इतके पाणीसाठा असून, धरणाच्या वरच्या बाजूला इगतपुरी तालुक्यात अधूनमधून पावसाची हजेरी कायम असल्यामुळे दारणा धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने सुमारे १८०० क्यूसेक पाण्याचा दररोज विसर्ग केला जात आहे. १५२० क्यूसेक पाणी पालखेड धरणातून सोडले जात आहे. आळंदी, कडवा, भोजापूर यांची साठवण क्षमता कमी असली तरी, ते धरणे काठोकाठ भरल्यामुळे त्यातून पाणी सोडण्यावाचून पर्यायच नाही.