Beat Marshal Pellets Chili Powder | बीट मार्शलच्या डोळ्यात फेकली मिरची पूड
बीट मार्शलच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या बीट मार्शलच्या डोळ्यांमध्ये पल्सर दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एकाने मिरचीची पूड फेकून पोबारा केल्याची घटना घडली. सुदैवाने बीट मार्शल दुचाकीचालक पोलिसाने हेल्मेट घातलेले असल्यामुळे मिरची पूड डोळ्यांत गेली नसल्याने  अपघात टळला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस नाईक परमेश्वर सोपान महाजन हे बीट मार्शल इंदिरानगर पोलीस ठाणे हद्द पाथर्डी फाटा भागात गस्तीवर होते. शुक्रवारी (दि.२४) रात्री आठ वाजेच्या सुमारास दामोधर चौकात विनाक्रमांक असलेली पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एकाने पोलिसांच्या दिशेने मिरचीची पूड फेकली.
सुदैवाने महाजन यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अगदी किरकोळ प्रमाणात मिरची उडाली, मात्र हेल्मेट नसते तर मिरची पूड डोळ्यांत जाऊन कदाचित अपघात घडला असता. मात्र हेल्मेट असल्यामुळे महाजन यांनी पल्सरवरून भरधाव गेलेल्या संशयितांचा पाठलागही सुरू केला. अंधाराचा फायदा घेत ते निसटून जाण्यास यशस्वी ठरले. याप्रकरणी महाजन यांनी दिलल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडलेला असतानाच पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून टवाळखोरांनी पोलीस यंत्रणेलाच जणू आव्हान दिले आहे. कोणतेही कारण नसताना पोलिसाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा हा प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतला असून, या प्रकरणी तपास सुरू आहे.


Web Title:  Beat Marshal Pellets Chili Powder
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.