शहरात दहा शाळांमध्ये आधारकेंद्र
By Admin | Updated: July 27, 2015 01:04 IST2015-07-27T01:04:32+5:302015-07-27T01:04:43+5:30
शहरात दहा शाळांमध्ये आधारकेंद्र

शहरात दहा शाळांमध्ये आधारकेंद्र
नाशिक : शहरात आधार नोंदणी केंद्रांची संख्या पुरेशी नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील दहा शाळांमध्ये नवीन आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे.
प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधारकार्ड सक्तीचे केल्याने तसेच शासकीय कामांसाठीदेखील आधार क्रमांक आवश्यक असल्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी धावपळ होत आहे. अनेक केंद्रांवर गर्दी झाल्याने कार्ड काढण्यास विलंबही होत आहे. त्यातून निर्माण झालेल्या वादावादीनंतर आधारकेंद्रे बंद पडली होती. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी गुजरात इन्फोटेक कंपनीशी संपर्क साधून शहरात दहा नवीन आधार नोंदणी किट मागविले असून, दहा ठिकाणी हे किट बसविण्यात आल्याची माहिती फरांदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. शहरातील रंगुबाई जुन्नरे शाळेत यातील एका केंद्राचे उद्घाटन आमदार फरांदे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास सुहास फरांदे, आमदार अपूर्व हिरे, प्रशासन अधिकारी उभेश डोंगरे, गुजरात इन्फोटेकचे कृष्णा वरगणे, प्रसाद फरगडे, अहेमद काझी, अवधूत कुलकर्णी, सुरेश मानकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)