नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजली नाशिकच्या कुंटणखाण्यावरील बांगलादेशी मुलीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:51 IST2017-12-14T20:43:36+5:302017-12-14T20:51:18+5:30
मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजली नाशिकच्या कुंटणखाण्यावरील बांगलादेशी मुलीची तस्करी
नाशिक : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्येही गुरूवारी बांगलादेशी मुलीची नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मुसळगाव कुंटणखाण्यावर करण्यात आलेल्या तस्करीचे प्रकरण गाजले. नाशिकचे आमदार जयवंतराव जाधव , देवयानी फरांदे यांनी याप्रकरणी विधानपरिषदेच्या सभागृहात लक्ष वेधले.
बांगलादेशी युवतीला भारतात अवैधरित्या दलालामार्फत पाठविणाºया तिची मावशी माजीदा अब्दुलसह सर्व दलालांचा शोध घेतला जावा आणि पिडित मुलीला सुरक्षा प्रदान करुन तत्काळ न्याय द्यावा आणि संशयितांवर कायद्यान्वये कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी, याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषी पोलीस अधिकारी-कर्मचा-यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी जाधव व फरांदे यांनी विशेष उल्लेखाच्या सुचनेनुसार केली. जाधव म्हणाले,
मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. याप्रकरणी पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. याअगोदर पोलिसांनी संबंधित मुलीला सुखरूप बांगलादेशात सोडविल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता; मात्र प्रत्यक्षात त्या मुलीला बांगलादेशमध्ये तर पोहचविले गेले नाही परंतू मुंबईमार्गे कोलकाताच्या कुंटणखान्यापर्यंत पोहचविले गेले. एकूणच पोलीस आणि दलालांची हातमिळवणी असल्याचे यावरून अधोरेखित होते. तसेच मोक्का कायद्याची व्याप्ती वाढवून मुलींची सीमेपार होणारी तस्करी रोखली जावी आणि संशयित आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी फरांदे यांनी यावेळी केली. एकूणच या प्रकरणावरून अधिवेशन चांगलेच गाजले. यानिमित्ताने कुंटणखान्यावर विक्री होणा-या अल्पवयीन मुलींच्या व्यवसायाला आळा बसावा आणि दोषींना कठोर शिक्षा पोलीसांनी करावी, हीच अपेक्षा जिल्ह्यासह राज्यभरातून व्यक्त होत आहे.