सटाणा : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यातील ‘बागलाण सायकलिस्ट ग्रुप’ने पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व विटंबना थांबवावी याच्या जनजागृतीसाठी शनिवारी २५ किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली.
सटाणा-पिंपळदर-नवेगाव शिवार असा एकूण २५ कि.मीचा प्रवास करून ‘सायकल चालवा, निरोगी राहा’ तसेच गणपती विसर्जनाबाबत प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. बागलाण तालुक्यातील डॉक्टर, व्यावसायिक व शिक्षकांनी तसेच ज्यांना ज्यांना सायकलींची आवड आहे. अशा सर्वांनी एकत्र येऊन ‘बागलाण सायकलिस्ट ग्रुप’ची स्थापना केली.
ग्रुपतर्फे प्रामुख्याने वृक्षारोपण, गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक दृष्टीने गरिबांसाठी वैद्यकीय सेवा आदी उपक्रम राबविले जात आहेत.
या ग्रुपचे सदस्य दररोज सकाळी सरासरी २० ते २५ किमी सायकल प्रवास करतात.
शनिवारी सकाळी पावणेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वेगळ्या उद्देशासाठी, पर्यावरणाच्या जागृतीसाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि गणपती बाप्पांचे विसर्जन करताना पर्यावरणाचा समतोल आणि गणपतीची बाप्पांची विटंबना थांबवावी याबाबत जनजागृतीसाठी रॅलीला सुरुवात झाली.
रॅली नवेगाव शिवारात पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा गीतातून अभिवादन करण्यात आले.
नंतर सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक मोहन सूर्यवंशी यांनी सामूहिक कवायत घेतली.
परतीच्या प्रवासात रॅलीचे शहरातील शिवाजी रोड, यशवंतराव महाराज मंदिर, दोधेश्वर नाका, बसस्टॉपवर रॅलीची सांगता करण्यात आली.
---------------------
एकात्मता दर्शवणारा गणवेश सर्वांनी परिधान केला असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रॅलीत एकूण शालेय विद्यार्थ्यांसह ४५ सदस्यांनी सहभाग घेतला होता.
सर्वांनी मिळून लोकांनी सायकलिंगकडे वळावे, सायकलिंग करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता देता निसर्गालाही सोबत करावी, अशा वेगवेगळ्या घोषणांनी रॅलीचे लक्ष वेधून घेतले. रॅलीत बागलाण सायकलिंगचे अध्यक्ष डॉ. विशाल आहिरे, खजिनदार डॉ. किरण पवार, डॉ. अतुल जाधव, नितीन जाधव, डॉ. रवींद्र बागुल, डॉ. अभिजित थोरात, बाळासाहेब देवरे, रवींद्र भदाणे, रतन खैरणार, सचिन सोनवणे, मोहन सोनवणे, दीपक सोनवणे, मनीष येवला, विनोद शिरसाळे, हेमंत भदाने आदी सहभागी झाले होते. (१८ सटाणा सायकल)
180921\18nsk_9_18092021_13.jpg
१८ सटाणा सायकल