An attempt to poison the children from their parents | पित्याकडून शाळकरी मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न
पित्याकडून शाळकरी मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न

नाशिक : शैक्षणिक साहित्य मागितल्याचा राग आल्याने मद्यधुंद पित्याने आपल्या मुलांना बळजबरीने विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.
‘मातृ-पितृ देवो भव:’ अशी आपली संस्कृती असून आई-वडिलांना सर्वोच्च दर्जा दिला जातो. माता-पित्याचे नाते जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते, मात्र या कलियुगात या नातेसंबंधालाही काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच चिमुकलीच्या गळ्यावर आईने ब्लेडने वार करून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास गती घेत नाही तोच पुन्हा शिंदे गावात बळजबरीने पित्याने आपल्या शाळकरी मुलीच्या तोंडात कीटकनाशके टाकून ठार मारण्याचा केलेला प्रयत्नही तितकाच संतापजनक आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पंढरीनाथ बाबुराव बोराडे (४८, रा. शिंदेगाव) याने आपल्या लहान मुला-मुलींना बळजबरीने विषारी कीटकनाशके पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मुलीने शैक्षणिक साहित्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या मद्यपी बापाने तिला बळजबरीने कीटकनाशके पाजण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
यावेळी घरात मुलांची आई नव्हती. या प्रकरणी पित्याविरुद्ध मुलाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत बहिणीने शाळेचा गणवेश, पाठ्यपुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग येऊन संशयित पंढरीनाथ याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जनावरांच्या गोठ्यात असलेल्या रोगर कीटकनाशकाची भरलेली बाटली आणून मुलीच्या तोंडात बळजबरीने ओतण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत भावाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक के. एल. सोनोने करीत आहेत.
पालकांची मानसिकता चिंतेचा विषय
काही दिवसांपूर्वीच आपल्या १४ महिन्यांच्या चिमुकलीला आईनेच विनाकारण ठार मारल्याची घटना औरंगाबादरोडवर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी रुग्णालयातच अवघ्या तीन ते चार दिवसांच्या नवजात चिमुरडीचा जन्मदात्री आईने गळा आवळून खून केल्याचीही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर शिंदे गावातील या घटनेने टोकाचे पाऊल उचलणाºया आई-वडिलांच्या कृत्याविषयीची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.


Web Title: An attempt to poison the children from their parents
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.