बदलीचा ठराव करताच ग्रामसेवकाने ठोकली धूम, ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:29 IST2024-01-26T17:29:17+5:302024-01-26T17:29:37+5:30
नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील प्रकार

बदलीचा ठराव करताच ग्रामसेवकाने ठोकली धूम, ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन
बाबासाहेब गोसावी,
विल्होळी (ता ). नाशिक- प्रजासत्ताक दिन म्हणजे थेट जनतेचा कारभार मात्र याच दिवशी नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील ग्रामस्थांना मात्र वेगळाच अनुभव आला. ग्रामसभेत दुरुत्तरे देणाऱ्या ग्रामसेवकामुळे ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी ग्राम सेवकाच्या बदलीचा ठराव केला. त्यानंतर हा आधिकार तुमचा नाही तर शासनाचा आहे असं सांगत ग्रामसेवक सभेतून निघून ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन बसल्याने ग्रामस्थांनी त्याच्या बदली साठी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. अखेरीस विस्तार अधिकाऱ्यांना या वादग्रस्त ग्रामसेवकाची तातडीने उचलबांगडी करावी असे निवेदन देण्यात आले.
विल्होळी येथील हनुमान मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक सरपंच जानकाबाई चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध विकास कामे करण्याचे ठराव करून समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विल्होळी चुंचाळे रस्ता, कुसुमाग्रज नगर सभा मंडप, वाडी वस्त्यांवरील पाणीपुरवठा, बजरंगवाडी टेकडी लेवल, संघर्ष नगर पाणीपुरवठा अशा समस्या मांडल्या असता त्यावर ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात येत नव्हते. ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना हा अधिकार माझा नसून सरपंच व ग्रामसभेचे अध्यक्ष यांचा आहे. अशी अरेरावीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने ग्रामविकास अधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. नंतर सभा तहकूब न करता ग्रामविकास अधिकाऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पलायन केले ग्रामस्थांनी विचारणा केली. ग्रामसभेमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांचा बदली करण्याचा कोणताही अधिकार नाही, तो अधिकार वरिष्ठ पातळीवरील आहे. असे सांगितले . त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी निवेदन तयार करून ते विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे व श्रीधर सानप यांना देण्यात आले.