इंदिरानगरला कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:45 IST2019-01-18T00:45:21+5:302019-01-18T00:45:37+5:30
इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

इंदिरानगरला कृत्रिम पाणीटंचाई
इंदिरानगर : इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळा होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पाटील गार्डन, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, मानस सोसायटी, देवदत्त सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी, गीतांजली कॉलनी यांसह परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम मिळत नसल्याने वापराचे पाणी कुठून आणणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलकुंभ भरले जात नाहीत त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
चौकट===
ऐन सणासुदीच्या काळात महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, यापूर्वी प्रभाग ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अॅड. श्याम बडोदे यांनी पाणीप्रश्नावरून पूर्व प्रभागाचा सभेचा सभात्याग केला होता. त्यानंतर परिस्थिती सुधारली होती, परंतु आता परिस्थिती जैसे थे झाली आहे.