चहूबाजूंनी डोंगर असलेल्या धुळवडला खणाणला ‘मोबाइल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:14 IST2019-01-03T18:11:39+5:302019-01-03T18:14:24+5:30
चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने धुळवडकरांना नववर्षाची ही दिलेली भेटच म्हणावी लागेल.

सिन्नर तालुक्यातील धुळवड येथे दूरसंचार विभागाकडून गाव तेथे दूरध्वनी सेवा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, दूरसंचार नितीन महाजन, जी. जी. बोरसे, मंदा आव्हाड, प्रकाश आव्हाड, गणपत सांगळे, इंदूबाई आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड आदी.
नांदूरशिंगोटे : चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने धुळवडकरांना नववर्षाची ही दिलेली भेटच म्हणावी लागेल.
ट्राय आणि दूरसंचार विभागाच्या ‘गाव तेथे दूरध्वनी सेवा’ या धोरणातून चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या तालुक्यतील धुळवड गावात दूरसंचारकडून सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे गावात जलद गतीने इंटरनेट सेवा मिळू लागली आहे. सिन्नरपासून अवघ्या २७ किलोमीटरवर धुळवड हे गाव आहे. छोटेसे वसलेले खेडे, चारही बाजूंनी डोंगर टेकड्या. आजूबाजूच्या वस्त्यापाडे धरून अंदाजे दीड हजार लोकवस्तीचे हे गाव दूरसंचार सेवेपासून वंचित होते.
दूरसंचार विभागाने गावात मनोरा लावला त्यानंतर हे गाव जगाच्या संपर्कात आले. धुळवड या छोट्याशा गावात कोणत्याही कंपनीची दूरसंचार सेवा नसल्याने तेथील नागरिकांना छोटछोट्या कामासाठी तालुक्याला जावे लागत होते. पण आता गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना फायदा होणार आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत दूरसंचार कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्याकडे दूरसंचार मनोरा उभारण्यासाठी आग्रह धरला होता. महाजन यांनी या विषयाचा पाठपुरावा करीत ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनोरा उभारण्यात
आला.
गावच्या यात्रेचे औचित्य साधत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, दूरसंचार कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्या उपस्थितीत या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दूरसंचार सल्लागार समिती सदस्य निवृत्ती डावरे, जनसंपर्क अधिकारी जी. जी. बोरसे, सरपंच मंदा आव्हाड, उपसरपंच प्रकाश आव्हाड, गणपत सांगळे, इंदूबाई आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, निवृत्ती आव्हाड, अशोक आव्हाड, मधुकर आव्हाड, बाळकृष्ण सांगळे, ग्रामसेवक एस. ए. पाटोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.