आरोग्य विद्यापीठाला पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:36 IST2017-07-26T00:35:59+5:302017-07-26T00:36:14+5:30
नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल कार्यालयामार्फत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान-२०१७’ मध्ये आरोग्य विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी नोंदवित विविध पारितोषिक पटकावली आहे.

आरोग्य विद्यापीठाला पारितोषिक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल कार्यालयामार्फत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान-२०१७’ मध्ये आरोग्य विद्यापीठाच्या संघाने चमकदार कामगिरी नोंदवित विविध पारितोषिक पटकावली आहे. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात ‘आव्हान’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादचा विद्यार्थी महेश गणपतराव बन व एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालय, रत्नागिरीची विद्यार्थिनी हर्षा सुनील भट यांनी या वर्षीचे सर्वोत्तम स्वयंसेवकाचे प्रथम क्रमांकाचे पदक प्राप्त केले व त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघास दोन फिरते चषक प्राप्त झाले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड चान्सलर्स ब्रिगेडमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यालय मंत्रालय, मुंबई यांच्या पुढाकाराने सदर शिबिरात महाराष्ट्र राज्यातील २६ विद्यापीठे सहभागी झाले होते. विद्यापीठांमधून ७५० विद्यार्थी, ४०० विद्यार्थिनी व ७२ महिला, पुरुष संघव्यवस्थापक सहभागी झाले होते. या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचावकार्यासाठी किंवा आपत्तीची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे प्रशिक्षक, मार्गदर्शन, प्रात्याक्षिक आणि सराव प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.