सटाणा नगर परिषदेची जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:39 IST2020-11-27T00:38:46+5:302020-11-27T00:39:14+5:30
कळवण- पूनंद प्रकल्पातून जाणाऱ्या सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीची पाइपलाइन काठरे दिगर चौफुली परिसरात फुटल्यामुळे काठरे दिगरचे गुलाब गांगुर्डे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. याबाबत गांगुर्डे व आदिवासी शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

सटाणा नगर परिषदेची जलवाहिनी फुटली
कळवण : कळवण- पूनंद प्रकल्पातून जाणाऱ्या सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीची पाइपलाइन काठरे दिगर चौफुली परिसरात फुटल्यामुळे काठरे दिगरचे गुलाब गांगुर्डे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. याबाबत गांगुर्डे व आदिवासी शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
पोलीस बंदोबस्तात युद्धपातळीवर झालेल्या जलवाहिनीचे काम हे निकृष्ट दर्जाचा उत्कृष्ट नमुना असून, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सावरपाडा येथे पाइपलाइन फुटल्यामुळे गॅस्ट्रोची लागण होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पाइपलाइन फुटल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचते, त्यामुळे साथीचे आजार बळावल्याची घटना यापूर्वी सावरपाड्यात घडली असल्यामुळे व सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे आदिवासी बांधव साथीच्या रोगाच्या भीतीने भयभीत झाले आहेत.
या जलवाहिनीने या भागातील आदिवासीचे नुकसान केले असून, सातत्याने फुटणाऱ्या या योजनेचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.
पूनंद परिसरातील आदिवासी बांधवांनी पूनंद धरण बांधण्यासाठी आपल्या शेतजमिनी दिल्या आणि भूमिहीन झाले त्याच आदिवासी बांधवाना पाइपलाइन आज जीवघेणी ठरू लागली असून, या योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्याकडे केली आहे.