शिक्षण समितीसाठी आज नियुक्ती
By Admin | Updated: April 26, 2015 23:37 IST2015-04-26T23:34:19+5:302015-04-26T23:37:11+5:30
प्रक्रियाविशेष महासभा : स्थायीच्या रिक्त दोन जागांसाठी होणार घोषणा

शिक्षण समितीसाठी आज नियुक्ती
नाशिक : महापालिकेची शिक्षण समिती गठित करण्यासाठी १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सोमवारी (दि.२७) होणाऱ्या विशेष महासभेत राबविली जाणार असून, सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वपक्षीय गटनेते महापौरांकडे तौलनिक संख्याबळानुसार आपल्या सदस्यांची नावे सुपूर्द करणार आहेत. दरम्यान, स्थायीच्या रिक्त झालेल्या दोन जागांवरही सेनेच्या सदस्यांची नियुक्ती घोषित केली जाणार आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार महापौरांनी शिक्षण समिती गठित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. तौलनिक संख्याबळानुसार मनसेचे ५, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी ३, भाजपा आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी २ आणि एक अपक्ष याप्रमाणे १६ सदस्यांची नियुक्ती समितीवर केली जाणार आहे. त्यासाठी महापौरांनी गटनेत्यांकडे नावे मागितली असून, सोमवारी सकाळी महासभेपूर्वी नावांची यादी गटनेत्यांकडून सुपूर्द केली जाणार आहे. सत्ताधारी मनसेकडून मीना माळोदे, गणेश चव्हाण आणि अर्चना जाधव यांची नावे जवळपास निश्चित झाली असून, अन्य दोन नावांवर एकमत न झाल्याने त्यावर सोमवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीकडून संजय साबळे, समाधान जाधव, रंजना पवार व उषाताई अहिरे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून सिंधूताई खोडे, ज्योती गांगुर्डे आणि फुलावती बोडके यांच्यापैकी दोन नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते, तर कॉँग्रेसकडून वत्सलाताई खैरे यांचे नाव जवळपास निश्चित असून, समीना मेमन किंवा योगीता अहेर यांच्यापैकी कुणा एकाला संधी मिळेल, अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून हर्षा बडगुजर, नंदिनी जाधव अथवा शैलेश ढगे यांच्या नावाची चर्चा आहे. अपक्षगटाकडून संजय चव्हाण यांचे नाव निश्चित मानले जात आहे. दरम्यान, स्थायी समितीवरील सेनेचे सदस्य सचिन मराठे व वंदना बिरारी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर शोभा फडोळ, मंगला आढाव किंवा शैलेश ढगे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)