विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट, कळवणला चार जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:51 IST2021-05-20T15:50:41+5:302021-05-20T15:51:50+5:30
कळवण : शहरात संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कळवण पोलिसांनी रॅपिड अँटिजन टेस्ट करत सुमारे शंभर नागरिकांची टेस्ट केली.

विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट, कळवणला चार जण पॉझिटिव्ह
कळवण : शहरात संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कळवण पोलिसांनी रॅपिड अँटिजन टेस्ट करत सुमारे शंभर नागरिकांची टेस्ट केली. यात चार जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र, विविध कारणे सांगत वाहनधारक मात्र रस्त्यावर फिरताना दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून हीच परिस्थिती मेनरोडवर पाहायला मिळाली. अत्यावश्यक कारण सांगत वाहनधारक रस्त्यावर फिरताना दिसत होते. पोलिसांनी काही ठिकाणी अडवले तरी प्रत्येक जण अत्यावश्यक काम असल्याचे कारण सांगत असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम दिसत असल्यामुळे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी मेनरोडवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची थेट कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले. शहरात नागरिकांची वर्दळ सुरूच असल्याने बुधवारी सकाळी कळवण पोलिसांनी धडक कारवाई करत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. बसस्थानकासमोर टेस्ट करण्यात आल्या.