नाशकात करवाढीच्या निषेधार्थ भाजपाविरोधक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 19:21 IST2018-02-22T19:19:42+5:302018-02-22T19:21:32+5:30
कॉँग्रेसचे उद्या धरणे : माकपने केली निदर्शने, राष्ट्रवादीचे उद्यापासून मोर्चे

नाशकात करवाढीच्या निषेधार्थ भाजपाविरोधक रस्त्यावर
नाशिक - महापालिकेने घरपट्टीत केलेल्या जबर वाढीचे पडसाद आता उमटू लागले असून राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३) पासून सहाही विभागांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे तर शहर कॉँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि.२२) महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करत सत्ताधारी भाजपाचा निषेध केला. विरोधकांनी या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
मंगळवारी (दि.२०)झालेल्या महासभेत मिळकत करामध्ये ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या करवाढीच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग करत सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर, भारतीय विद्यार्थी सेनेने महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानासमोर घरपट्टीची होळी करत करवाढीचा निषेध नोंदविला होता. आता राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवार (दि.२३) पासून महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांवर मोर्चे नेण्याचे नियोजन केले आहे. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले, या करवाढीमुळे बालकाच्या खिशावरच पालकाकडून डल्ला मारण्याचा प्रकार घडत असून शुक्रवारी (दि.२३) नाशिकरोड येथे बिटको पार्इंटवरून विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर, दि. २७ फेबु्रवारीला नाशिक पूर्व, दि. २८ फेबु्रवारीला सिडको, दि. १ मार्च रोजी पंचवटी, दि. २ मार्च रोजी नाशिक पश्चिम आणि दि. ३ मार्च रोजी सातपूर विभागीय कार्यालयावर मोर्चे नेण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, मकरंद सोमवंशी, किशोर शिरसाठ, अमोल वाजे, मुजाहित शेख, शंकर मोकळ आदी विभागीय अध्यक्ष उपस्थित होते. राष्ट्रवादीबरोबरच शहर कॉँग्रेसच्यावतीने करवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी कळविले आहे. दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर माकपच्यावतीने करवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. या करवाढीने सामान्य माणसाला मोठा फटका बसणार असल्याचे सांगत सदर करवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.