निवडीची तहकूब सभा वादात?
By Admin | Updated: November 6, 2014 00:20 IST2014-11-05T23:16:25+5:302014-11-06T00:20:12+5:30
प्रशासनाची बघ्याची, तर कर्मचाऱ्यांची लुडबुडीची भूमिकाही चर्चेत

निवडीची तहकूब सभा वादात?
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांवर रिक्त पदांसाठी बोलावलेली विशेष सभा तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच सभा असलेल्या विजयश्री चुंबळे यांच्यावर आली; शिवाय अध्यक्षांनी जाहीर केलेल्या विषय समिती वाटपावरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला असून, त्याबाबत विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.
मुळातच ही विशेष सभा सहा विषय समित्यांचे वाटप तीन पदाधिकाऱ्यांना देण्याबरोबरच रिक्त असलेल्या विविध विषय समित्यांच्या २३ जागांसाठी सदस्यांची निवड करण्यासाठी बोलावण्यात आली होती. त्यामुळे एकापेक्षा जास्त संख्या असल्यास निवडणुकीने ही पदे वाटप करावीत असे महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६४ च्या कलमांमध्ये नमूद केले आहे; शिवाय निवडणूक बिनविरोध असेल तर त्याची घोषणा अध्यासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष करू शकतात, असेही या नियमात म्हटले आहे. स्थायी समितीच्या दोन जागांसाठी शैलेश सूर्यवंशी, बाळासाहेब गुंड, संगीता ढगे व मनीषा बोडके यांचे चार अर्ज दाखल करण्यात आले होते. पैकी मनीषा बोडके यांनी अर्ज माघारीची तयारी दर्शविली होती; मात्र राष्ट्रवादीतील तीनपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अन्य सर्वच समित्यांच्या रिक्त पदांवरील निवड रखडली. त्यामुळे या समित्यांवर निवड करण्यासाठी गोळा केलेले अर्ज आता तसेच असून, पुढील बैठकीत त्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. मात्र अशी सभा तहकूब करता येते काय यावर प्रशासनाने कोणतीही सभा तहकूब करता येते असे स्पष्ट केले असले, तरी विषय समित्यांचे वाटप करताना सूचक व अनुमोदक कोण, सर्वसंमतीने ही निवड झाली काय, मग अध्यक्षांनी अचानक जाहीर केलेल्या विषय समित्यांच्या वाटपाचीही पुनर्निवडणूक होणार काय यांसह अनेक प्रश्न आता सदस्य विभागीय आयुक्तांना देण्यात येणाऱ्या अर्जात करणार असल्याचे कळते. (प्रतिनिधी)