ऐन लग्नसराईत खर्चासाठी होणार कसरत
By Admin | Updated: November 13, 2016 22:51 IST2016-11-13T22:45:34+5:302016-11-13T22:51:39+5:30
नोटा बंद : अक्षदापासून ते आचाऱ्यांपर्यंत अडथळ्याची शर्यत

ऐन लग्नसराईत खर्चासाठी होणार कसरत
सुदर्शन सारडा ओझर
लग्न म्हटलं की होऊ द्या खर्च ही मानसिकता आतापर्यंत अनेकांची राहिली आहे. त्यात समाजामध्ये तर अजूनदेखील अनेकजण प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करताना मागे पुढे पाहत नाही. परंतु केंद्राने पाचशे आणि एक हजारच्या नोटांना चलनातून बाद केल्याने अनेकजण संकटात सापडल्याचे चित्र दिसते आहे. दिवाळी झाल्यावर लगेचच लग्नाचे मुहूर्त सुरू होत असून, त्यात नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटताच दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सरकारने मुख्य चालणारे चलन बाद केले. छोट्या नोटा मात्र मर्यादित राहून गेल्या आहेत. त्यात लग्नसराई म्हटलं की अनेक छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी यादी करावी लागते. अक्षदांपासून ते बेंजो, लॉन्स, आचारी, मंडप, कपडे, दागिने, घोडावाला, वऱ्हाडींच्या गाड्या, काही किरकोळ देणेघेणे व अजून इतर अनेक छोट्या गोष्टींचा समावेश असतो. परंतु गगनाला भिडलेली महागाई त्यात आर्थिक देवाण घेवाण ही शक्यतो रोख स्वरूपात होत असते. परंतु सर्वात जास्त वापरात असलेले चलन बाद झाल्यामुळे कुणीही हजार पाचशेच्या नोटा घेण्यास तयार नाही. ज्यांच्या कुटुंबातील लग्न हे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहेत ते अॅडव्हान्सच्या स्वरूपात नोव्हेंबरला भरल्याच्या पावत्या मागत आहेत. तर काही जण डबल भाव घ्या परंतु पाचशे आणि हजारच्या नोटा घ्या, असे सांगत आहेत. आजच्या चलनाचा विचार केला तर जवळपास ७० टक्क्यांच्यावर उलाढाल ही मोठ्या नोटांवर चालू होती आणि ज्या लोकांनी रोखीचे नियोजन करून ठेवले होते त्यांना मोठी चिंता आहे. परंतु ऐन लग्नसराईमध्ये बाजारावर याचा गंभीर परिणाम एकदम स्पष्ट जाणवतोय. काही व्यापारी बाहेर फिरायला गेले आहे तर काही जण धंदा झाला नाही तरी चालेल परंतु नोटा बंद या मानसिकतेमध्ये आहेत.
लॉन्सचे भाडे सर्वसामान्य जरी म्हटले तरी किमान लाखाच्या घरात जाते. त्यात काही लॉन्सचालक काही सेवांचा समावेश करून त्या देतात. परंतु भाडे देताना किंवा अॅडव्हान्स देताना मात्र शंभरच्या खालच्या नोटा द्या असे सांगत आहेत. ज्यांनी ८ तारखे पूर्वी भरले त्यांचे नशीब समजावे त्यानंतर मात्र बरीच दमछाक होणार आहे. जेवणाचे नियोजन करणारा आचारीदेखील काही दिवस मंदीमध्ये राहील असे सांगण्यात येते. मागच्या लग्नसराईपर्यंत तर खाण्याच्या वस्तू मध्ये वारेमाप खर्च करणारी काही बडी मंडळी यंदा समाजसेवकाच्या भूमिकेत दिसत असून, इतका खर्च कशाला करायचा, दोघांच्या नावे अडीच अडीच लाख टाकून देऊन असे बोलत आहेत. तिसरी मुख्य गरज म्हणजे सोन्याचीदेखील तीच परिस्थिती आहे. सध्या संपूर्ण सराफ बाजारात जणू संचारबंदी लागल्यासारखे चित्र असून, विविध कारणास्तव सराफ बाजारावर सरकारची नजर असल्याचे चित्र
आहे .
तेथेदेखील कुणी खरेदी करण्यास राजी नाही. कपड्यांचा बाजारदेखील थंडावला असून, अनेक मोठे मोठे किरकोळ विक्रेते बस्ता बसविताना पहिले कोणत्या नोटा आहे, ते विचारत आहेत.