‘अंजनेरी’त हेलिकॉप्टरची घरघर टळली; पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:10 IST2018-08-19T20:50:02+5:302018-08-19T21:10:24+5:30
यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

‘अंजनेरी’त हेलिकॉप्टरची घरघर टळली; पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान
नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील संरक्षित राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केलेल्या अंजनेरीसह ब्रह्मगिरी परिसरात हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रजातींच्या बियांचे गोळे तयार करून टाकण्याची मोहीम आखली गेली होती. यासाठी काही राजकीय, शैक्षणिक, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र यामुळे येथील वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवासात वास्तव्य करणाऱ्या सूची क्रमांक एकमधील गिधाड या दुर्मीळ पक्ष्यासह अन्य प्रजातींना धोका निर्माण होणार होता. यामुळे वनविभागनाशिक पश्चिम व जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. हेलिकॉप्टरच्या घरघरीचे संकट टळले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. बीजारोपणाचा जरी प्रथमदर्शनी हेतू दिसत असला तरी त्र्यंबकेश्वर रस्त्यासह शहरातील विविध भागांमध्ये चक्क ‘त्र्यंबके श्वरमध्ये प्रथमच... हेलिकॉप्टर सफरीचा आनंद लुटा...’ अशा व्यावसायिक जाहिरातीचे फलकही संबंधितांच्या नावाने झळकले होते. याबाबत उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलिल मती यांनी तत्काळ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन संरक्षित राखीव वनक्षेत्र व तेथील वन्यजिवांना उद्भवणारा धोका याबाबत शनिवारी (दि.१९) सविस्तर चर्चा केली. वनविभागासह जिल्हा प्रशासनानेही तडकाफडकी परवानगी नाकारली. यामुळे शहरातील वन्यजीवप्रेमींसह पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.