...आणि त्याने वापरली स्वत:चीच चोरलेली गाडी
By Admin | Updated: May 16, 2014 00:16 IST2014-05-16T00:14:07+5:302014-05-16T00:16:56+5:30
वाहनाच्या कागदपत्रांत फेरफार : संशयित पोलीसांच्या ताब्यात

...आणि त्याने वापरली स्वत:चीच चोरलेली गाडी
वाहनाच्या कागदपत्रांत फेरफार : संशयित पोलीसांच्या ताब्यात
पंचवटी : दोन वर्षापुर्वी गंगापूर पोलीस ठाण्यात वाहनचोरी झाल्याची तक्रार देऊन नंतर स्वत:च दुचाकीच्या क्रमांकात खाडाखोड करून चोरलेली दुचाकी वापरणारा भामटा अलगदरित्या पोलीसांच्या जाळयात आला आहे. सागर प्रेमचंद त्रिभुवन असे संशयिताचे नाव असुन पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने वाहन तपासणी दरम्यान ही कारवाई केली आहे.
वाहनचोरीचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असल्याने पंचवटी पोलीसांनी संशयिताला गंगापूर पोलीसांकडे सुपूर्द केले आहे. गंगापूर पोलीसांनी खोटी फिर्याद नोंदविली म्हणून संशयिताला ताब्यात घेतले असुन त्रिभुवन याने इंन्श्युरन्ससाठी चोरीची खोटी तक्रार देत फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. काल दुपारी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी म्हसरूळ गुलमोहर नगर भागात वाहनतपासणी करत असतांना सीबीझेड क्रमांक (एम. एच. १५ डी. एच. ११०९) ही संशयास्पद जातांना दिसली म्हणून ती थांबवून कागदपत्रांची चौकशी केली त्यावेळी गजपंथनगर येथे राहणार्या संशयित सागर त्रिभुवन याने कागदपत्रे दाखविली मात्र त्यावर खाडाखोड व वाहन क्रमांकातही बदल दिसल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घडला प्रकार कथन केला आणि पोलीसही अचंबित झाले.
त्रिभुवन याने दोन वर्षापुर्वी नवी सीबीझेड चोरी गेल्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्यानंतर आरटीओतून वाहनाचा क्रमांक आल्यानंतर त्रिभुवन याने मिळालेल्या क्रमांकातील शेवटचा अंक खोडून तिच गाडी वापरत होता त्यानंतर काही दिवसांनी त्याने इंन्श्यूरन्स कंपनीकडून इंश्यूरन्स पास करून घेतला व फायनन्सची रक्कम परतफेड केली होती. वाहनाचे कागदपत्रे बघितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलीसांनी संशयित त्रिभूवन याला ताब्यात घेतले असुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे राजेश निकम, प्रविण वाघमारे, राजेश लोखंडे, संजय राऊत, बाळू लभडे आदिंनी ही कारवाई केली आहे. (वार्ताहर)
मोठी टोळी
इंश्यूरन्स पास करण्यासाठी स्वत:च स्वत:ची गाडी चोरून पोलीसात तक्रार दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात मोठी टोळी कार्यरत असुन यात वाहनधारक व इंश्युरंन्स कंपनीच्या कर्मचार्यांचा सहभागी असल्याची शक्यता आहे.
शांताराम अवसरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी