न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरीलआंदोलनही गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:50 IST2020-09-26T21:23:15+5:302020-09-27T00:50:20+5:30
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यभरातील समन्वयकांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले.

न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरीलआंदोलनही गरजेचे
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरही आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत राज्यभरातील समन्वयकांनी बैठकीत बोलताना व्यक्त केले.
सकल मराठा समाजाच्या राज्यातील समन्वयकांची नाशिक येथे बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यभरातील प्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी बोलताना अहमदनगर येथील संजय भवर म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबतही शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. आरक्षणाला स्थगिती देण्यापेक्षा न्यायालयाने पन्नास टक्क्यांमध्ये आरक्षण का बसविले नाही. मराठा आरक्षणाचे राजकारण झाले आहे. आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अडकले गेलो आहोत. स्थगिती देण्यापेक्षा ओबीसींमधून आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न आपण विचारायला हवा होता, असे मत त्यांनी मांडले.
रायगडचे विनोद साबळे यांनी, मराठ्यांना दिल्ली काही नवीन नाही. वेळ आली तर आरक्षणासाठी दिल्लीपर्यंत जाऊन, असे मत व्यक्त करून राज्य शासनाने जाहीर केलेली पोलीस भरती रद्द करण्याची मागणी केली. प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूरचे दिलीप पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई ही न्यायालय, सरकार आणि रस्त्यावर अशा तीन पातळ्यांवर लढली गेली पािहजे. यासाठी रस्यावरील आंदोलन अधीक तीव्र केले पहिजे; मात्र आंदोलन करताना सर्व नियमांचे पालन केले जावे. सचिन तोडकर म्हणाले, सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलनाशिवाय मार्ग नाही. ठाणे येथील सुधाकर पतंगराव यांनी, मराठा आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करावयाची असल्याचे मत व्यक्त केले. सांगलीचे प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांची स्थिती सांगितली. अनेकांकडे फी भरायला पैसे नसतात. राज्य शासनाने सारथी योजनेची वाट लावली आहे. आता ही आपली शेवटची लढाई आहे असे सांगितले.
औरंगाबादचे सतीश पाटील म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाने इतके मोर्चे काढले त्याचा निर्णय काय झाला. आता रुमणे मोर्चा काढून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले. किशोर चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षण घटनापीठाकडे गेले आहे. घटनापीठ केव्हा तयार होईल याचा कुणालाही अंदाज नाही. ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविली तर मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठू शकते. आपली लढाई आता केंद्राबरोबर आहे. यापुढे आईच्या जातीचे दाखले मिळावेत, अशी आपली मागणी करायला हवी, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथील धनंजय जाधव यांनी आरक्षणाची लढाई लढताना आपल्या वेगवेगळ्या भूमिका नसाव्यात, असे मत व्यक्त केले. ठाणे येथील प्रवीण निसाळ, मुंबईचे प्रकाश देशमुख यांनीही यावेळी आपापली भूमिका मांडली.