इगतपुरी तालुक्यात दुरुस्तीच्या कामांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:04 IST2020-06-05T22:23:18+5:302020-06-06T00:04:08+5:30
मान्सूनचे आगमन झाल्याने इगतपुरीतील ग्रामीण भागासह देवगाव येथे दुरुस्तीच्या कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लॅस्टिक, ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामांना बळीराजा प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

देवगाव परिसरात घराच्या दुरुस्तीत व्यस्त असलेले नागरिक.
देवगाव : मान्सूनचे आगमन झाल्याने इगतपुरीतील ग्रामीण भागासह देवगाव येथे दुरुस्तीच्या कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लॅस्टिक, ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामांना बळीराजा प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी मातीची घरे व जनावरांचा चारा खराब होऊ नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर करतात. एक दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे सोसाट्याच्या वारा, वादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिल्याने नागरिकांमध्ये कामांची चढाओढ सुरू झाली आहे. घरांवर आच्छादन टाकण्यासाठी बाजारात प्लॅस्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
जोरदार पाऊस येण्यापूर्वी वेळेत घरांची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य करत आहेत. तसेच पावसाळ्यात जनावरांचा चारा भिजू नये म्हणून जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था ताडपत्रीच्या साहाय्याने करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी हाती घेतले असून, छतावरील गळत असलेल्या ठिकाणांवर प्लॅस्टिकचे आच्छादन ठेवण्याचे काम जोरात चालू आहे.